वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला; सव्वासात लाखाच्या मुद्देमालासह दोघे अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

विनापरवाना, बेकायदेशीररित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक नगर तालुका पोलिसांनी पकडला. या कारवाईत सात लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नगर-पुणे रोडवरील चास गावाजवळील रस्त्याच्या कडेला शुक्रवारी (8) सायंकाळी साडेपाच वाजता केली.

नगर पुणे रोडने चास गावाजवळ एका माल ट्रकचा संशय आल्याने तालुका पोलिसांनी ट्रक (क्र. एम एच 12 एम व्ही 9267) थांबवून ट्रकचालकाकडे चौकशी केली असता ट्रकमध्ये गौण खनिज शासकीय वाळू असल्याचे त्यांना आढळून आले. चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे नाव सुखदेव किसन पवार आणि पांडुरंग उर्फ पांडा विनायक गरुड (दोघे रा. शिरूर, पुणे) असे असल्याचे समजले. त्यांच्याकडे रॉयलटी भरल्याबाबतची कसल्याही किरची पावती मिळून आली नाही. यावरून दोघेही वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघाना ताब्यात घेवून त्यांच्याकडील 32 हजार रुपये किंमतीची चार ब्रास वाळू, आणि सात लाख रुपये किंमतीचा ट्रक असा सुमारे 7 लाख 32 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी पो.कॉ. कमलेश पाथरूट यांच्या फिर्यादीवरून भा.द.वि. क. 379, 34 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून, तपास हे. कॉ. केदार हे करीत आहेत.