
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्तोरस्ती एक हजारहून अधिक डिजिटल बोर्ड लावून तीर्थक्षेत्र पंढरीचे विद्रूपीकरण केले होते. हे डिजिटल बोर्ड अडचण ठरत असल्यामुळे पंढरपूरकरांनी प्रचंड संताप व्यक्त करीत ‘गद्दारां’वर पिचकाऱया मारून त्यांना जागा दाखविली होती. यासंदर्भात दैनिक ‘सामना’ने दिलेल्या बातमीची दखल घेत आज नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करीत बेकायदेशीपणे लावलेले सर्व डिजिटल बोर्ड हटविले.
गुरुवारी (29 रोजी) आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर मिंधे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहरात एक हजारांहून अधिक डिजिटल बोर्ड लावले होते. या बोर्डमुळे वाहतुकीला अडथळा तर होत होताच; पण पंढरपूर शहराचे विद्रुपीकरण झाले होते.
पंढरपूर ही अध्यात्मिक नगरी आहे. लाखो वारकरी हरिनामाचा गजर करीत भक्तिभावाने येथे येतात. मिंधे गटाच्या नेत्यांनी मात्र पंढरीचा राजकीय आखाडा केला होता. शहरात सर्वत्र बोर्ड लावण्यात आले होते. पंढरपूरकरांमध्ये संतापाची भावना होती. शहराचे विद्रुपीकरण करणाऱयांना पंढरपूरकरांनी त्यांची ‘जागा’ दाखविली होती. तर दै. ‘सामना’ने ‘पंढरपूरचे झाले डिजिटलपूर’ या मथळय़ाखाली बातमी दिली होती. या बातमीची पंढरपूर नगरपरिषदेने तातडीने दखल घेत बेकादेशीरपणे लावण्यात आलेले डिजिटल बोर्ड आज हटविले.


























































