सिंधुदुर्गनगरीत 1 लाख 61 हजार रुपयांची अवैध दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी रात्री बांदा सटमटवाडी येथे पेट्रोलिंग दरम्यान केलेल्या कारवाईत 86 हजार 400 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू व मारुती सुझुकी झेन कार असा एकूण 1 लाख 61 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली.

गोवा ते सावंतवाडी अशी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना मिळाली होती. त्यानुसार या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक बांदा सटमटवाडी येथे गस्त (पेट्रोलिंग) घालत असताना समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी झेन (एमएच 02 एलए 6205) कारची तपासणी केली असता आत 86 हजार 400 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली.

त्यामुळे ही अवैध दारू व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले 75 हजार रूपये किमतीचे वाहन असा एकूण 1 लाख 61 हजार 400 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक केल्या प्रकरणी कार चालकाला ताबत घेण्यात आले असून त्यांच्यावर बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुधीर सावंत,आशिष गंगावणे, अनिल धुरी, मनोज राऊत, प्रवीण वालावलकर यांच्या पथकाने केली आहे.