
जालना शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या नुतन वसाहत भागातील हातभट्टीवर विशेष पथकाने छापा टाकून 1 लाख 23 हजार 700 रुपयांची गावठी हातभट्टी दारु व साहित्य जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर यांना जालना शहरातील नुतनवसाहत भागातील तुषार जाधव त्याच्या राहत्या घरात गावठी हातभट्टी दारु तयार करुन चोरटी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, राजेंद्रसिंह गौर व विशेष पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी नूतन वसाहत भागातील एका घरात छापा मारला. या ठिकाणी एक महिला व तुषार ताराचंद जाधव आढळले. त्यांच्या घराची पाहणी केली असता गावठी हातभट्टी दारु आढळली नाही. घराची व वाड्याची पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारकाईने पाहणी केली. त्यावेळी घराच्या अंगणात जमिनीवर फरशीखाली छोटे छिद्र दिसले. फरशी बाजुला केली असता जमिनीखाली हौद तयार करुन त्यामध्ये तयार केलेली गावठी हातभट्टी दारु साठवून ठेवली होती. जमिनीत तयार केलेल्या हौदातून पंपाव्दारे दारू बाहेर काढून आरोपी त्याची चोरटी विक्री करत होते. यावेळी पोलीसांनी गावठी हातभट्टी दारुसह एकूण 1 लाख 23 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त केला आहे. आरोपी तुषार ताराचंद जाधव, एक महिला व तिचा पती यांच्याविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारुविरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक संपत पवार, पोना सुभाष पवार, राठोड, धनाजी कावळे, रामेश्वर बघाटे, दिलीप कांबळे, राजेंद्र वेलदोडे, सुरेश नलावडे, यशवंत मुंढे, पोकॉ. किशोर जाधव, परमेश्वर धुमाळ, मपोना अल्का केंद्रे, रत्नमाला येडके व चालक धोंडीराम मोरे यांनी केली आहे.




























































