दीड महिन्यातच पोलिसांची प्रतिमा काळवंडली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

विनोद पवार । पिंपरी

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच खाकी वर्दीचे खरे स्वरूप बाहेर येऊ लागले आहे. पोलिसांचे एक एक कारनामे पुढे येत आहेत. पोलीस ठाण्यात जाणाऱ्या तक्रारदारांना तासन्तास ताटकळत ठेवण्याचे, पैशांची मागणी करत मारहाण करण्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. गुंडांची बडदास्त ठेवणाऱ्या आणि सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पोलिसांचा हा मुजोरपणा चव्हाट्यावर आल्याने पोलीस आयुक्तांवर दीड महिन्यातच दोन वेळा अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची उचलबांगडी करण्याची वेळ आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे आयुक्तालयाचे विभाजन होऊन पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला. आयुक्तालय सुरू झाल्यावर शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल, नागरिकांना त्यांच्या तक्रारी सहजरीत्या देता येतील, अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आर. के. पद्मनाभन यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यात कायम सुसंवाद राहायला हवा यासाठी पोलीस चौकीत नाही तर चौकात दिसेल. तक्रारदाराला त्याची तक्रार देण्यासाठी ‘फोन अ फ्रेंड’ यासारखी योजना राबविण्याचा संकल्प केला.

शहरासाठी असे काही चांगले निर्णय घेणारा पोलीस आयुक्त भेटल्याने शहरवासीयांनीही आर. के. पद्मनाभन यांच्याकडून मोठी अपेक्षा ठेवली. मात्र, दुसरीकडे स्वतंत्र आयुक्तालय सुरू झाल्यापासून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच निर्ढावले आहेत. खाकी वर्दीतील त्यांची गुंडगिरी एक एक घटनांमधून पुढे येत आहे.

दिघी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ७ सप्टेंबर रोजी आळंदीतील एका हॉटेल व्यवस्थापकासह कर्मचाऱ्याला पैशांची मागणी करत मारहाण केली. एवढेच नाही तर तक्रार देण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकावरही अरेरावी केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची ही ‘दादागिरी’ समोर आली. हॉटेल मालकाने वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर हवालदारावर केवळ मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल करून बोळवण करण्यात आली. पोलीस आयुक्तांपर्यंत हा व्हिडीओ गेल्यानंतर अखेर सहायक निरीक्षक महेंद्र कदम आणि हवालदार महेश खांडे यांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न करून सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्यामार्पâत चौकशी सुरू करण्याचे आदेश पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी दिले.

या घटनेला दोन आठवडे उलटत नाही तोच हिंजवडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा कारनामाही समोर आला. विनयभंग प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणीला हिंजवडी पोलिसांनी तब्बल चार तास ताटकळत बसवून ठेवले. एवढेच नाही तर तिलाच आरोपीला शोधून आणण्याचा आगाऊ सल्लाही पोलिसांनी दिला. पोलिसांच्या या अजब सल्ल्याने तरुणीने थेट वकील गाठला अन् पोलीस आयुक्तांनाच नोटीस बजावली. अखेर, पोलीस आयुक्तांच्या आदेशाने हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली.

गुन्हेगारांना नाही पोलिसांचे भय
एकीकडे सर्वसामान्यांना कायद्याची भीती दाखवत त्यांच्यावर पोलिसांकडून धाक-दपटशा केला जातो. दुसरीकडे मात्र, गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिलेले दिसत नाही, अशा घटनाही गेल्या काही दिवसांत समोर आल्या. पोलिसांच्याच सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशा या घटनांमध्ये ३० ऑगस्ट रोजी मोटार थांबविण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. दारूच्या नशेतील तरुणींनी चिंचवड पोलीस ठाण्यातच ठाणे अंमलदाराला शिवीगाळ केली, तर १ सप्टेंबर रोजी पिंपळे-सौदागर पोलीस चौकीतच एकाने पोलिसाच्या कानफटात लगावली.