>> दुष्यंत पाटील
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या संगीतानं जगभर प्रसिद्ध होणारा संगीतकार म्हणजे डेबूसी. विशिष्ट प्रकारचे मूड्स व्यक्त करण्याचं कौशल्य, ऑर्केस्ट्राचा उत्कृष्ट वापर करण्याचा हातखंडा या गोष्टी त्याच्या संगीतरचनांमध्ये स्पष्टच जाणवायच्या. अमूर्त भावना संगीतातून व्यक्त होणारी डेबूसीची अजरामर कलाकृती म्हणजे ‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा.’ डेबूसीच्या ‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’च्या संगीतानं विसाव्या शतकात ठसा उमटवला.
पाश्चात्य अभिजात संगीतातला आधुनिक कालखंड देबूसीच्या संगीतानं सुरू होतो, असं बहुतेक जण मानतात. प्रचलित संगीतापेक्षा खूप वेगळं, चित्रकारांच्या इम्प्रेशनिस्ट शैलीशी साम्य असणारं असं संगीत देबूसीनं रचलं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच आपल्या संगीतानं तो जगभर प्रसिद्ध झाला. विशिष्ट प्रकारचे मूड्स व्यक्त करण्याचं कौशल्य, ऑर्केस्ट्राचा उत्कृष्ट वापर करण्याचा हातखंडा या गोष्टी त्याच्या संगीतरचनांमध्ये स्पष्टच जाणवायच्या. वॅग्नरसारख्या जर्मन संगीतकारांचा असणारा संगीतातला दबदबा त्याच्यामुळे कमी झाला. त्याच्या संगीतानं फ्रेंच प्रकारचं संगीत लोकप्रिय व्हायला लागलं.
विसाव्या शतकातलं पहिलं दशक म्हणजे त्याच्या प्रतिभेच्या बहराचा काळ. साहित्यकृती, चित्रकारांच्या कलाकृती अशा संगीताशी संबंध नसणाऱया गोष्टींपासून प्रेरणा घेत, त्यातल्या अमूर्त भावना आपल्या संगीतातून व्यक्त करायचा प्रयत्न त्यानं केला. त्याच्या या प्रयत्नांमधूनच बनलेली एक अजरामर कलाकृती म्हणजे ‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा.’
‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’मध्ये तीन भाग येतात. पहिल्या भागात ‘जीग्ज’ नावाची एक रचना येते. जीग हे एका प्रकारचं इंग्रजांचं लोकनृत्य आहे. त्याच्या इंग्लंडमधल्या वास्तव्याच्या आठवणींनी प्रेरित होऊन त्यानं ही रचना केली, असं बरेच जण मानतात. डेबूसीच्या रचनेत मूळच्या इंग्रज नृत्यातल्या तालाशी साधर्म्य असलं तरी त्यानं हे संगीत आपल्या शैलीत लिहिल्यामुळे ते खूपच वेगळं वाटतं. त्याची रचना मनात रेंगाळणारी, काहीशी गूढ वाटते.
‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’चा दुसरा भाग आहे ‘आयबीअरिया.’ आयबीअरिया म्हणजे युरोपच्या नैऋत्य दिशेला असणारा भाग. यात स्पेन आणि पोर्तुगाल हे देश येतात. स्पेनमधलं संगीत, लोकजीवन आणि संस्कृती यांविषयी डेबूसीला विलक्षण आकर्षण होतं. खरं तर डेबूसी स्पेनला गेला नव्हता, पण त्याच्या कल्पनेतलं स्पेनमधलं जीवन, तिथली दृश्यं त्यानं ‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’च्या दुसऱया भागात दाखवण्याचा प्रयत्न केला. ‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’मधला हा दुसरा भाग सर्वात जास्त लोकप्रिय ठरला. या भागात एकूण तीन रचना येतात.
‘आयबीअरिया’मधली पहिली रचना आहे ‘थ्रू दि स्ट्रीट्स अँड पाथ्स.’ स्पेनच्या शहरांमधल्या गजबजीच्या रस्त्यांचं चित्रण डेबूसीनं या संगीतरचनेत केलंय. ही रचना ऐकताना आपल्याला रस्त्यांवरच्या लोकांचा उत्साह, त्यांचं चैतन्य जाणवल्यावाचून राहात नाही. संगीतरचनेला स्पॅनिश रंग येण्यासाठी डेबूसीनं ‘हबेनेरा’ या स्पॅनिश नृत्यातल्या तालाचा वापर या रचनेत केला. या रचनेत डेबूसीनं ऑर्केस्ट्रातल्या विविध प्रकारच्या वाद्यांचा वापर अतिशय कल्पकतेनं केलाय.
‘आयबीअरिया’मधली दुसरी रचना आहे ‘दि फ्रॅग्रन्सेस ऑफ दि नाईट.’ पहिल्या रचनेत असणाऱया स्पेनमधल्या रस्त्यावरच्या दिवसा असणाऱया गजबजीनंतर दुसऱया रचनेत तिथल्या रात्रीची शांतता दिसते. या रचनेत डेबूसीनं भुरळ घालणाऱया गूढ रात्रीचं चित्रण करण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱया भागातली शेवटची रचना आहे ‘दि मॉर्निंग ऑफ अ फेस्टिवल डे.’ स्पॅनिश उत्सवामधला उत्साह या रचनेतल्या जोशपूर्ण तालातून जाणवतो. उत्सवातलं आतषबाजी, मिरवणूक आणि नृत्यं या गोष्टींचं चित्रण डेबूसीनं या रचनेत मोठय़ा कल्पकतेनं केलंय.
‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’मधला शेवटचा भाग आहे ‘राउंड्स ऑफ स्प्रिंग.’ या भागात एक रचना येते. या रचनेत असणाऱया वसंत (स्प्रिंग) ऋतूतल्या आनंदी वातावरणानं ‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’चा शेवट होतो. या रचनेत डेबूसीनं वेगवेगळ्या फ्रेंच लोकगीतांच्या चालींचे तुकडे घेऊन स्वतच्या शैलीत त्यांची गुंफण केली आहे. नृत्य चालू असताना होणाऱया हालचालींचा भास या रचनेत होतो. वसंत ऋतूत ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट त्यानं वरच्या सप्तकांमधले स्वर वापरत दाखवला आहे.
डेबूसीच्या ‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’च्या संगीतानं विसाव्या शतक ठसा उमटवला. स्ट्रव्हीन्स्की, रॅव्हल यासारख्या विश्वविख्यात संगीतकारांच्या रचनांवर या संगीतानं प्रभाव टाकला. विसाव्या शतकातली अनेक चित्रपटांमधल्या संगीतावरही ‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’चा प्रभाव जाणवतो. विसाव्या शतकावर ‘इमेजेस फॉर ऑर्केस्ट्रा’नं का छाप का टाकावं हे पाहण्यासाठी आपण युटय़ुबवर जाऊन ‘debussy image for orchestra’ च्या संगीतरचना नक्कीच ऐकायला हव्यात!