
हवामान खात्याने सातारा जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असल्याने पश्चिम घाटात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे रविवारी सकाळी साडेचार फुटांपर्यंत उघडले जाणार आहेत. त्यामुळे कोयनेचा विसर्ग प्रतिसेकंद 30 हजार क्युसेकच्या वर जाणार आहे. दरम्यान, आज कोयनेचे दरवाजे दीड फुटापर्यंत स्थिर असून, सद्यःस्थितीला धरणातून 11 हजार 696 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयनापात्रात होत आहे.
सातारा जिल्ह्यात अन्यत्र पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पश्चिम भागात अद्यापि पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत; परंतु मागील पाच दिवसांतील जोरदार पावसामुळे कोयनेसह प्रमुख धरणांमधील पाण्याची आवक मोठी आहे. त्यामुळे कोयना, धोम, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम-बलकवडी अशा सर्वच धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनेसह कुडाळी, उरमोडी, तारळी, उत्तर मांड नद्यांचा फुगवटा वाढला आहे. परिणामी, जिल्ह्याची पूरस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. प्रशासनाने नद्यांकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
त्यातच आज हवामान खात्याने सातारा जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. अर्थातच, त्यामुळे प्रामुख्याने पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढणार आहे, हे गृहीत धरून कोयनेसह सर्वच धरणांमधील विसर्ग वाढण्याची चिन्हे आहेत. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे काल दीड फूट उचलण्यात आले आहेत. दरवाजांतून आणि धरण पायथा विद्युतगृहातून मिळून आजमितीला 11 हजार 696 क्युसेकने कोयनापात्रात विसर्ग होत आहे. तथापि, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून कोयना धरणाचे दरवाजे रविवारी सकाळी 10 वाजता साडेचार फुटांपर्यंत उघडण्यात येणार असल्याचे सूतोवाच धरण व्यवस्थापनाने केले आहे. त्यामुळे या दरवाजामधून प्रतिसेकंद 28 हजार आणि धरणपायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक असा मिळून प्रतिसेकंद 30 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. मुळातच धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदी पाणीपातळीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. आता याहूनही जादा पाणी सोडल्यानंतर नदीपातळीत आणखी वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरण 92 टीएमसीवर
कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात 24 तासांत कोयनानगरला 94, नवजा 119 व महाबळेश्वरला 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवणक्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 92.59 टीएमसीवर गेला असून, उपयुक्त पाणीसाठा 87.59 टीएमसी आहे. मागील 24 तासांत धरणातील पाणीसाठय़ात 3.62 टीएमसीने वाढ झाली आहे.



























































