मॉन्सून यंदा बळीराजाची चिंता वाढवणार; 2026 मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, हवामान खात्याचा पहिला अंदाज जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी मान्सून 2026 बाबतचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. गेल्या वर्षी नियोजित वेळेपेक्षा लवकर आलेला मॉन्सून यावर्षी मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवण्याची शक्यता आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 92 टक्के पर्जन्यमानाच अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाच्या महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या उपस्थित नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या मॉन्सूनचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आला. यावर्षी सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. पावसाचे प्रमाण 90 टक्के ते 95 टक्के असते त्यावेळी सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी सांगितले की, जून जुलै ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात एल निनो परिस्थिती असणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मॉन्सूनला सकारात्मक परिस्थिती असेल त्यामुळे एल निनो च्या नकारात्मक परिणाम जाणवणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभाग मॉन्सूनबाबत काय अंदाज मांडणार याकडे देशातील बळीराजा आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.