
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला. शुक्रवारी दिवसभर मुसळधार बरसला. उपनगरातही धुमाकूळ घातला. कल्याणच्या पुढे बदलापूर, अंबरनाथमध्ये रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने मध्यरात्री लोकल खोळंबल्या. मात्र आज दुसर्या दिवशी मुंबईत दिवसभर पावसाची संततधार होती. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत होती, तर रस्त्यावरही वाहतुकीचा खोळंबा दिसला नाही. अधूनमधून पावसाची जोरदार सर येत होती, परंतु त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले नाही. दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
ठाणे, मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा
ठाणे आणि मुंबईत उद्या रविवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 29 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल. वातावरण दिवसभर ढगाळ असेल. 30 जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी दिली.
11 विमानोड्डाणे रद्द, 9 उड्डाणांचे मार्ग बदलले
शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन्ही दिवस ढगाळ वातावरणामुळे आणि पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमी दृश्यमानतेचा परिणाम विमानोड्डाणांवर झाला. दिवसभरात तब्बल 11 उड्डाणे रद्द करण्यात आली, तर 9 उड्डाणे दुसर्या दिशेने वळवावी लागली. इंडिगोची पाच तर एअर इंडिया आणि आखाती देशांतील प्रत्येकी एक विमान उड्डाण रद्द करावे लागले.
ऑरेंज अलर्ट
मुंबईसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या 24 तासांत मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शनिवारी दिवसभरातला
पाऊस (मिमी)
ठाणे 160
कल्याण 231
मुरबाड 332
कर्जत 300
उल्हासनगर 296
अंबरनाथ 280
भिवंडी 185
शहापूर 195
मुंबई 180
कोकण रेल्वे खोळंबली
माणगावजवळील घोडानदीला पूर आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. वीर-माणगावदरम्यान घोडनदीने धोक्याची पातळी ओलांडून रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे सकाळी 10.30 वाजता कोकण रेल्वे ठप्प झाली. कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या चार गाडय़ा थांबवण्यात आल्या होत्या. यामध्ये 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी वीर स्थानकात, 50105 दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी कोलाड स्थानकात, 12617 एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस करंजाडी येथे तर 10103 मांडवी एक्स्प्रेस रोहा येथे थांबवण्यात आली होती. दुपारी 1.30 वाजता कोकण रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू झाली, मात्र कोकण रेल्वेच्या गाडय़ा उशिराने धावत होत्या.
15 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्ग सुरू
जगबुडी आणि वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ठप्प असलेला मुंबई-गोवा महामार्ग अखेर तब्बल 15 तासांनंतर शनिवारी सकाळी 11.15 वाजता सुरू करण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पुराचे पाणी ओसरल्याने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, मात्र दुपारच्या सुमारास परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे महामार्ग पुन्हा ठप्प झाला. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच जगबुडी नदी ओसंडून वाहू लागल्यामुळे नदीपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.



























































