
पोलीस असल्याची बतावणी करून दोन तोतयांनी बांधकाम कंपनीची दोन कोटी रुपयांची रोकड पळविल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला अटक केली. गौरव मसुरकर असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 44 लाख रुपये हस्तगत केले आहेत. एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
खासगी बांधकाम कंपनीत कामाला असलेल्या ज्येष्ठ नागरिकाने या सदंर्भात तक्रार केली होती. तक्रादाराला शुक्रवारी त्याच्या मालकाने दोन कोटी रुपये दिले होते. ते पैसे त्यांना गिरगाव येथील एका व्यापाऱयाला देण्यास सांगितले होते. त्याच्यासोबत कंपनीमधील दोन कर्मचारी गेले होते.
सायंकाळी ते गिरगावच्या पांजरापोळ येथे आले. तेव्हा मोटरसायकलवरून दोघे जण आले. गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून या दोघांनी बॅगेत काय आहे अशी विचारणा केली. तेव्हा तक्रारदार याने बॅगेत दोन कोटी रुपये असल्याचे सांगितले. काही वेळाने एकाने फोन करून दोघांना कॅशसहित पकडले असे सांगून फोन कट केला. त्यानंतर दोघांनी ती बॅग घेण्याचा प्रयत्न केला. ठगाने तक्रारदार यांना धक्काबुक्की करून बॅग घेऊन पळ काढला. घडल्या प्रकाराची माहिती तक्रारदाराने त्याच्या मालकाला दिली. त्यानंतर व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून गौरवला अटक केली.



























































