
काल समस्त महिलावर्गाने वडाची पूजा मन:पूर्वक केली. वडाच्या फांद्या घरी आणूनही पूजा झाली. आता आज त्या फांद्यांचे काय…?

काल वटपौर्णिमा झाली… हल्ली वडाची फांदी घरीच आणून तिची पूजा केली जाते… मात्र पूजेचा हा धार्मिक सोपस्कार पूर्ण झाला की, त्या फांदीचे काय करायचे हा प्रश्न पडतो… वटवृक्षासारख्या पूजनीय वृक्षाच्या फांद्या चक्क फेकून दिल्या जातात, पायदळीही तुडवल्या जातात… अशावेळी धार्मिक कर्मकांडाबरोबरच पर्यावरणप्रेमही जपण्यासाठी ‘ग्रीन अंब्रेला’ ही निसर्ग संस्था जनजागृतीबरोबरच फेकलेल्या वडाच्या फांद्या गोळा करून आणून देण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा शहरी भागांत आठ लाखांहून जास्त फांद्या वटपौणिमेनिमित्त तोडून विकल्या जातात. त्यामुळे शेकडो वटवृक्षांची हानी होते. यासाठी या संस्थेच्या वसई आणि विक्रोळी येथील नर्सरीत पळस, पांगरा, काटेसावर, शिवाणा अशा प्रकारच्या हिंदुस्थानी झाडांची रोपे तयार केली जातात. गेल्या वर्षी या फांद्यांपासून ७०० वडाची रोपे तयार करण्यात आली. ती घाटकोपर ते मुलुंड, आरे कॉलनी, विविध उद्यानांत लावण्याचं काम सुरू आहे.

मुंबईजवळील जंगलात दोन हजार वेगवेगळय़ा प्रकारच्या वृक्ष प्रजाती आहेत, तरीही आपल्याकडील रस्त्यांवर ही झाडे न लावता विदेशी झाडे मोठय़ा प्रमाणात लावली जातात. याकरिता नर्सरीत हिंदुस्थानातील झाडांची रोपे उगवून ती येथील वेगवेगळ्या उद्यानांत लावतो. बऱ्याचदा आंबा, पेरू, चिकू हीच झाडे लोकं लावतात किंवा याव्यतिरिक्त दुसरी झाडे लोकांनाच माहीतच नाहीत. कारण आपण एकाच प्रकारची झाडे लावतो. जंगलात वेगवेगळय़ा प्रकारची झाडे असतात. त्या प्रत्येक झाडांवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव, सूक्ष्म जीव, कीटक, प्राणी, पक्षी अवलंबून असतात. चुकीची झाडे लावून निसर्गाचं नुकसान करत आहोत. यासाठी सध्या दुर्मिळ झाडं लावण्याचं काम सुरू असल्याचे ग्रीन अंब्रेलाचे संस्थापक विक्रम यंदे सांगतात.
वडाची फांदी घरी कशी रुजवाल?
एखादी फांदी घरी आणल्यास त्याच्या खालचा भाग तिरका कापा. ‘कॅराडेक’ नावाच्या रुटिंग हार्मोनच्या द्रावणात ही फांदी १० ते १५ मिनिटे भिजत ठेवायची. यामुळे त्या फांदीला लवकर मुळं फुटतील. अशी फांदी भुसभुशीत मातीत ५० टक्के खत, ३० टक्के माती आणि भाताचं तुस, कोकोपीठ किंवा वाळू, खत, माती इत्यादी मिश्रणात ही फांदी लावायची. ही फांदी पावसाळ्यात रुजते. सुरुवातीला कमी सूर्यप्रकाशात ठेवायचं. नवीन पानं आणि मुळं फुटायला लागली की, भरपूर सूर्यप्रकाशात ते रोप वाढू द्यायचं.
वडाविषयी गैरसमज
वड, पिंपळ ही झाडं लावायला टाळाटाळ केली जाते. ती खूप वाढतात, भिंत पोखरली जाईल, इमारत पडेल असे अनेक गैरसमज या झाडांविषयी आहेत. दक्षिण मुंबईत मोठय़ा प्रमाणात ही झाडे आहेत. त्यामुळे तिथला भाग जास्त थंड वाटतो. या झाडांच्या मुळांना वाट मिळते त्याप्रमाणे ती वाढतात, मात्र त्यामुळे धोका पोहोचत नाही.
वडाचं झाड तासाला ७१२ किलो एवढा प्राणवायू देतं. दिवसाला २ टन बाष्प हवेत सोडतं. त्यामुळे आर्द्रता, गारवा वडाच्या झाडाच्या अवतीभोवती निर्माण होतो. ग्लोबलवार्मिंगवर मात करण्यासाठी वडाची झाडे जास्तीत जास्त शहरांमध्ये लावली पाहिजेत. तरच तापमान थंड राहायला मदत होईल. प्रदूषणावर मात करण्यासाठी वड, पिंपळ या जातीच्या वृक्षांची लागवड करायला हवी.
संपर्कासाठी…
विक्रम यंदे (विक्रोळी) 9833988166
भारती देशपांडे (गोरेगाव) 9833587613
योगेश क्षत्रिय (ठाणे) 9967672597
मोनिका देशमुख (वाशी) 9594969494




























































