सना मकबूल बिग बॉस विजेती
टीव्ही अभिनेत्री सना मकबूल ही रिऑलिटी शो बिग बॉस ओटीटी-3 ची विजेती ठरली. रॅपर नेजीने दुसरे तर रणवीर शौरीने तिसरे स्थान पटकावले. सना हिला 25 लाख रुपयांचा चेक आणि ट्रॉफी देण्यात आली. दीड महिना बिग बॉसच्या घरात हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या शोचे सूत्रसंचालन अभिनेता अनिल कपूरने केले.
आज गटारी अमावास्या, तळीरामांची जोरदार तयारी
आषाढ महिन्याची समाप्ती झाली असून उद्या दिव्यांची म्हणजेच गटारी अमावास्या आहे. त्यानंतर लगेच श्रावण महिना सुरू होईल. गटारी अमावास्या साजरी करण्यासाठी तळीरामांनी जोरदार तयारी केली आहे. चिकन, मटन, मासे आणि वेगवेगळ्या मांसाहारावर ताव मारण्याचा बेत अनेकांनी आखला आहे. गटारी अमावास्या आणि रविवारचा योग जुळून आल्यामुळे तळीरामांच्या आनंदाचा पारा उरला नाही. त्यामुळे उद्याची गटारी जोमात साजरी केली जाईल. मुंबईत गटारी अमावास्येनिमित्त बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आषाढी अमावास्या 4 ऑगस्ट 2024 ला दुपारी 4 वाजून 42 मिनिटांनी संपणार आहे. यंदा 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे.
बीएसएनएलकडून वायनाड युजर्सना फ्री कॉलिंग-डेटा
केरळच्या वायनाड जिह्यात भूस्खलन झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या गावाच्या मदतीला बीएसएनएल धावून आले आहे. वायनाड जिल्हा आणि नीलांबूर तालुक्यातील सर्व युजर्संना बीएसएनएलकडून तीन दिवसांसाठी फ्री कॉलिंग आणि डेटा देण्याची घोषणा केली आहे. युजर्संना रोज 100 एसएमएससुद्धा फ्री पाठवता येऊ शकणार आहेत. बीएसएनएलने शनिवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बीएसएनएल चूरलमाला आणि मुंदक्कई गावातील सर्व लोकांना मोफत मोबाईल कनेक्शन देत आहे. बीएसएनएलने आरोग्य विभागासाठी टोल फ्री नंबर, जिल्हा प्रशासन मुख्यालय आणि मदत करणाऱ्या सर्व समन्वयकांसाठी हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल सेवा सुरू केली आहे.
यूपीआय सेवा आज 3 तास बंद, एचडीएफसी बँकेचा अलर्ट
एचडीएफसी बँकेची यूपीआय सर्विस उद्या, रविवारी तीन तास बंद राहणार आहे. रविवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सर्विस ग्राहकासाठी उपलब्ध राहणार नाही, अशी माहिती एचडीएफसी बँकेकडून देण्यात आली आहे. ग्राहकांचा बँकिंग अनुभव अधिक चांगला करण्यासाठी महत्त्वाचे अपडेट करण्यात येणार आहेत. त्यामुळे तीन तास यूपीआय सर्विस बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात एचडीएफसी बँक करंट आणि सेविंग्स अकाउंट होल्डर्ससाठी फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल देवाण-घेवाण बंद राहणार आहे. बँकेचा मोबाइल अॅप, जीपे, व्हॉट्सअॅप पे आणि पेटीएम सर्विस बंद राहणार आहे.