
सामना प्रतिनिधी । मुंबई
नवीन कृषी विद्यापीठे
राज्यातील चार कृषी विद्यापीठांना संशोधन व इतर पायाभूत सुविधांसाठी तीन वर्षांत प्रत्येकी 150 कोटी असे एकूण 600 कोटी रुपये देण्यात येणार असून 2019-20 या अर्थसंकल्पात प्रत्येकी 50 कोटी रुपयांप्रमाणे 200 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
काजू उद्योगाला प्रोत्साहन
महाराष्ट्र काजू उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे. काजू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याचा फायदा खास करून कोकणातील काजू उत्पादक व प्रक्रिया उद्योगाला होईल.
अपात्र शेतकऱयांनाही लाभ
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017ची व्याप्ती वाढवली. त्यात खावटी कर्जाचा समावेश. तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे या योजनेसाठी यापूर्वी अपात्र ठरलेल्या शेतकऱयांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार लवकरच निर्णय घेणार.
महिला उद्योजकांसाठी भूखंड राखीव
महाराष्ट्र सरकारने नवीन औद्योगिक धोरण 7 मार्च 2017 रोजी जाहीर केले आहे. मोठय़ा उद्योगांच्या तुलनेत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये कमी गुंतवणूक व अधिक रोजगाराची क्षमता आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी पार्क. सुरुवातीला पन्नास तालुक्यांत पथदर्शी प्रकल्पांना सुरुवात. त्यासाठी 30 टक्के भूखंड महिलांसाठी राखून ठेवणार. या योजनेसाठी 300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.
दिव्यांगांना घरे
दिव्यांगांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद. 80 टक्के दिव्यांग व्यक्तींना सरकार घरे बांधून देणार.
एसटी मंडळाला भरीव निधी
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या एसटीच्या बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद. एसटी महामंडळात 700 नव्या बस खरेदीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यापूर्वी 50 कोटींचा निधी महामंडळाला दिला होता. या अर्थसंकल्पात बस खरेदीसाठी 160 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल.
जे.जे. कला महाविद्यालयाला 25 कोटी
सर जे.जे. कला, वास्तुशास्त्र व उपयोजित कला ही तीन महाविद्यालये एकाच प्रांगणात आहेत. या महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.
क्रीडा संकुलाचा कायापालट
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष धोरण राबवण्याची योजना. त्यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद. संभाजीनगर जिह्यातील करोडी येथे राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना. तसेच संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील वाळुंजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण.
आरोग्य विभागाला 10 हजार कोटी
सार्वजनिक आरोग्य विभागाला 10 हजार 581 कोटी 79 लाख 51 हजार रुपयांची तरतूद केली आहे.
शिवसृष्टीला 50 कोटी
पुणे जिह्यातल्या हवेली तालुक्यातील आंबेगावमध्ये महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शिवसृष्टी प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयांचा निधी.
रायगडसाठी 59 कोटी
किल्ले रायगडाचे जतन व संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत 59 कोटी रुपये खर्च केला आहे. या आर्थिक वर्षात हा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
सागरी जैवविविधता प्रकल्प
नवी मुंबईतील ऐरोली येथील कांदळवन व सागरी जैवविविधता प्रकल्पाला 30 कोटी रुपयांचे अनुदान प्रस्तावित असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र सदनात टिळकांचा पुतळा
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये लोकमान्य टिळक यांचा पुतळा उभारण्याची योजना.
मुंबईत वाजपेयींचे स्मारक
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाच्या धर्तीवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारण्याचा सरकारचा संकल्प.
इतर मागासवर्गीय महामंडळाला अनुदान
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसींना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाला 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह
ओबीसी मुलांसाठी 17 व मुलींसाठी 17 अशी 34 वसतिगृहे सुरू करण्यात मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 200 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.
कोतवाल-सरपंचांच्या मानधनात वाढ
राज्यातील कोतवालांच्या मानधनात 50 टक्के वाढ आणि 50 पेक्षा अधिक वय असलेल्य कोतवालांच्या मानधनात तिपटीने वाढ. त्याचजोडीला सरपंचाच्या मानधनात भरीव वाढ प्रस्तावित केली आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
धनगरांना आदिवासींच्या सवलती
धनगर समाजासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या समाजासाठी विविध 22 योजना राबवण्याची योजना आहे. मेंढीपालन, मेंढय़ांसाठी विमा, वसतिगृह, परदेशातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, धनगर समाजातील बेघरांसाठी 10 हजार घरकुले अशा विविध योजना राबवून धनगर समाजाला मुख्य समाजात आणण्यासाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ही तरतूद राज्याच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून करण्यात येईल; पण आदिवासी विकास विभागासाठी राखून ठेवलेल्या निधीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
कुडाळमध्ये मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक
ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांचे सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळमध्ये स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडीमध्ये शिवरामराजे भोसले, नाशिकमधील सिन्नरमध्ये वीर भागोजी नाईक यांचे, रायगडमधील चिरनेरमध्ये वीर नाग्या कातकरी यांचे आणि गडचिरोलीतील घोट येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
मार्च 2020 अखेर 4 लाख 71 हजार कोटींचे कर्ज
पुढील वर्षी मार्च 2020अखेर राज्याकरील कर्जाचा बोजा 4 लाख 71 हजार 642 कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कर्जावरील व्याजापोटी सरकारला तब्बल 35 हजार 207 कोटी रुपयांची व्यवस्था करावी लागणार आहे.
ठळक आर्थिक तरतुदी
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी 2 हजार 720 कोटी रु.
बळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी 1 हजार 531 कोटी रु.
जलसंपदा विभागासाठी 12 हजार 597 कोटी 13 लाख 89 हजार रु.
मृद व जलसंधारण विभागासाठी 3 हजार 182 कोटी 28 लाख 84 हजार रु. गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटी रु.
फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालयासाठी 16 कोटी रुपये खर्च अपेक्षित महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या पुनरुज्जीवनासाठी 20 कोटींची तरतूद
ग्राम अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी कुंभार, कोळी, गुरव, तेली, परीट, माळी, सुतार आदी बारा बलुतेदारांच्या सक्षमीकरणासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अनुदानासाठी 100 कोटी रु.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागासाठी 3 हजार 980 कोटी 87 लाख 12 हजार रु.
विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रभागासाठी 2 हजार 814 कोटी 71 लाख 18 हजार रुपयांची तरतूद
दहावी व बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास योजना
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी 4 हजार 649 पोलीस शिपायांची पदे भरणार
विधवा परितक्त्या व घटस्फोटीत महिलांच्या स्वयंरोजगारासाठी 200 कोटी रु.
अल्पसंख्याक महिला व युवकांच्या रोजगारासाठी 100 कोटी रु.





























































