बसण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मुलांच्या आरोग्यावर होतोय परिणाम, गोदरेज इंटेरिओचा अभ्यासात निष्पन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बसण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. याबाबत शिक्षणतज्ञ आणि आरोग्य सेवासुविधा तज्ज्ञांनी एका वेबिनार मध्ये चिंता व्यक्त केली आहे.

हिंदुस्थानातील आघाडीचा फर्निचर ब्रँड असणाऱ्या गोदरेज इंटेरिओने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की चुकीच्या बसायच्या पद्धतीमुळे घरून अभ्यास करणाऱ्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहे. त्यासाठी ‘घरून शिक्षण घेत असताना मुलांची घ्यायची काळजी’ या विषयावर गोदरेज इंटेरिओ आणि एरगॉनॉमिक्स रिसर्च सेल यांनी एक सर्व्हेक्षण केले. त्यासाठी देशभरातील 3 ते 15 या वयोगटातील 350 शालेय विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यात आला. लॉकडाऊन मुळे शाळा बंद व्हायच्या आधीच्या काळापेक्षा 2 ते 3 तास जास्त म्हणजेच दिवसाला साधारण कमीत कमी 4 ते 6 तास मुलं गॅझेटवर असतात असं या संशोधनात सहभागी झालेल्या पालकांनी सांगितलं. या वाढलेल्या स्क्रीन टाईम मुळे मुलांच्या शारीरिक आरोग्याचा धोका वाढला आहे. या अभ्यासातून हेही उघड झाले आहे की 52% विद्यार्थ्यांचे दररोज ऑनलाईन वर्ग असतात तर 36%मुलांचे ऑनलाईन वर्ग आठवड्यात चार वेळा असतात आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की 41% मुलांनी डोळ्यावर ताण येत असल्याच्या तक्रारी केल्या.

मुलांवर होणारा परिणाम लक्षात घेता गोदरेज इंटेरिओने ‘घरून शिक्षण घेण्यासाठी मुलांना मदत’ या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये मुलांचे पालक आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. राज्य सरकारने या महामारीला आटोक्यात ठेवण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन ठिकठिकाणी सुरूच ठेवल्यामुळे मुलांना घरूनच शिक्षण घेणे भाग पडत आहे. अशा वेळी त्यांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी घरात योग्य वातावरण निर्माण करण्याचे सर्वोत्तम मार्ग याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. या वेबिनार मध्ये शिकण्यासाठीची योग्य जागा, चांगल्या आहाराची गरज आणि मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी योग्य वातावरण तयार व्हावे म्हणून करायचे शारीरिक व्यायाम या सर्वांवर प्रकाश टाकण्यात आला. आज झालेल्या सत्रात 1700+ हून अधिक जण सहभागी झाले होते. यामध्ये आघाडीच्या शिक्षणतज्ज्ञ आणि आरोग्यसेवा तज्ज्ञांकडून या काळातील आव्हाने आणि त्यावरील उपाय याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

एक तासाच्या या अभ्यासपूर्ण वेबिनारमध्ये तज्ज्ञांनी या विषयाबाबतच्या विविध मुद्द्यांचा उहापोह केला. त्यामध्ये घरातून शाळा शिकतानाची मुलांची वर्तणूक, बसण्याची योग्य पद्धत, मुक्त वातावरणात शिक्षण घेत असताना घ्यायची काळजी असे विविध मुद्दे होते. आपण अंदाज केला होता त्यापेक्षा ऑनलाईन शिक्षण जास्त काळ सुरु आहे. अशा वेळी मधल्या सुट्टीचे महत्व आणि जुनी चांगली पेपर-पेन्सिल पद्धत यांच्याविषयी भाष्य केले. जोडीला प्रत्यक्ष आणि ऑनलाईन यांचे मिश्रण करून अध्ययन करता येईल का यावर विचार झाला. दीर्घकाळ चुकीच्या पद्धतीने अभ्यासाला बसल्यामुळे पाठीच्या मणक्यांचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे मुलांना कशा प्रकारे योग्य वातावरण तयार करून देता येईल यासाठीचे साधे सोपे मार्ग डॉ.रीना वालेचा यांनी सांगितले.

या वेबिनारचे संयोजन जागरण एज्युकेशन फाऊंडेशनचे सीडीओ लेफ्टनंट कर्नल ए शेखर यांनी केले. पॅनेल मध्ये डीपीएस नाशिक, वाराणसी आणि लावा नागपूरचे संचालक सिद्धार्थ राजगर्हिया, कोर्रोबोरीच्या सहसंस्थापक लीना अक्षर, बाल मानसतज्ञ चांदनी भगत, आगरकर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक फातिमा आगरकर आणि गोदरेज इंटेरिओच्या वर्कप्लेस आणि कार्याभ्यास संशोधन विभागाच्या मुख्य अभ्यासक डॉ.रीना वालेचा यांचा समावेश होता.