गुन्हेगारांच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी न्यायप्रणाली सुधारा!शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

अनेकदा गुन्हेगारांना शिक्षा होऊनही चौदा-चौदा वर्षांपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कायद्याचा धाक व वचक गुन्हेगारांना बसत नाही. त्याचबरोबर आपल्याकडे मानवतावादाचे मोठे थोतांड आहे. त्यामुळेही गुन्हेगारीला आळा घालताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायच्या असतील तर, गुन्हेगारांना झालेल्या शिक्षेची तातडीने कठोरपणे अंमलबजावणी करा तर आणि तरच जरब बसेल आणि संशोधन विधेयकाचा उद्देश पूर्ण होऊ शकेल, अशी परखड भूमिका शिवसेनेने आज लोकसभेत मांडली.

लोकसभेत आज विधी विरुद्ध क्रियाकल्प दुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.  अनेक कुख्यात गुन्हेगारांना केवळ मानवतावाद आणि मानवाधिकाराच्या थोतांडामुळे पोसले जाते हे त्यांनी कुख्यात अजमल कसाबचे उदाहरण देऊन सभागृहाला सांगितले. दहशतवाद्यांना झालेली शिक्षा त्वरित अमलात आली तर पुन्हा देशविघातक कारवाया करण्यासाठी कोणी धजावणार नाही. परिणामी सरकारने याबाबतीत न्यायालयीन सुधारणा करण्याची गरज आहे, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली.

मुंबईसह देशातील विविध ठिकाणी कुख्यात गुन्हेगारांची संपत्ती आहे. दाऊद इब्राहिमचे तर संपत्तीचे साम्राज्य सर्वच ठिकाणी पसरलेले आहे. केंद्र सरकारने कडक कायदा करून या गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे, ती अत्यंत योग्य असल्याचेही ते म्हणाले.

चिटफंड कंपन्यांच्या मुसक्या आवळा

देशातील विविध चिटफंड कंपन्यांनी विविध आमिषे दाखवून केवळ गोरगरीबच नाही तर सुशिक्षातांनाही गंडा घातला आहे. सुरुवातीला पैसे दामदुप्पट मिळत असल्याने ग्राहकही या चिटफंड कंपन्यांना भुलले आणि इतरांनाही त्यांनी गुंतवणूक करण्यास तयार केले. त्यामुळे चिटफंडची व्याप्ती वाढली आहे. या कंपन्यांवर कारवाई करणार असे सरकार सातत्याने म्हणत असले तरी त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे काही परत मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे या चिटफंड कंपन्यांच्या मुसक्या आवळा आणि गुंतवणूकदारांना त्यांचा घामाचा पैसा परत मिळवून द्या, अशी आग्रही मागणी शिवसेनेने आज लोकसभेत केली.