पाकिस्तानची अब्रू गेली! इम्रान खान यांचे अमेरिकेत स्वागत नाही

107

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या अमेरिका दौऱयावर आहेत. मात्र त्यांच्या या दौऱयाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर एकही अमेरिकी मंत्री किंवा सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता. यावेळी त्यांच्याबरोबर परराष्ट्र सचिव सोहेल महमूद आणि वाणिज्य सल्लागार अब्दुल रझ्झाक होते. हा अपमान गिळून अखेर इम्रान खान यांना त्यांची निवासाची सोय असलेल्या हॉटेलकडे मेट्रोने रवाना व्हावे लागले. या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर अब्रू गेली.

डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि दहशतवादाचा ठपका यामुळे इम्रान खान आधीच अडचणीत आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालण्यावरून सुनावले हेते, दहशतवादाला पोसणे बंद करण्यास सांगितले होते. तसेच पाकिस्तानची लष्करी मदतही रद्द केली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आज व्हाइट हाऊसमध्ये बैठक
इम्रान खान उद्या सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पाकिस्तानातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने ट्रम्प यांच्याकडून खान यांच्यावर दबाव आणला जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले स्वागत
विमानतळावर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि मोठय़ा प्रमाणावर पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन नागरिक उपस्थित होते. खान यांचा हा अमेरिकेचा अधिकृत दौरा असून या दौऱयात ते पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दौऱयात ते दोन्ही देशांसाठीच्या द्विपक्षीय करारांबाबत बोलणी करण्याची शक्यता आहे.

या मुद्दय़ांवर फोकस
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद, अफगाणिस्तानातील शांती प्रक्रिया, अमेरिकेने बंद केलेली लष्करी मदत पुन्हा सुरू करणे.
पाकिस्तानच्या धर्तीवरून होणाऱया दहशतवादी कारवायांना आळा घालणे, जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज याच्याविरोधात कठोर कारवाई करणे.
कर्जबाजारी पाकिस्तानला अमेरिकेकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे याबाबतची चर्चा होण्याची शक्यता.
इम्रान खान मेट्रोने हॉटेलकडे रवाना झाले.

आपली प्रतिक्रिया द्या