
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
इम्रान खान ११ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी त्याने बॉलीवूडस्टार आमीर खान, माजी क्रिकेटपटू सनील गावस्कर, कपिल देव आणि नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण दिले आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांना बोलवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खानचा पाकिस्तान तहरीक ए इन्साफ हा पक्ष ११६ जागांवर जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बहुमतासाठी त्यांना २१ जागा कमी पडत आहे. चार पक्षांनी आणि पाच अपक्षांनीही इम्रान यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्याचा विश्वास इम्रान यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांनाही बोलावण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, अशा सोहळ्याला परदेशी नेत्यांना बोलावणे योग्य आहे किंवा नाही याबाबत परराष्ट्र मंत्रालयाशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्क देशांच्या प्रमुखांना बोलावले आणि त्या नेत्यांनी नकार दिला तर पाकिस्तानची नाचक्की होईल, त्यामुळे परदेशी नेत्यांना बोलावावे किंवा नाही, याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. पीटीआयच्या नेत्यांनी याबाबत परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.




























































