मी किती काळ तुरुंगात राहणार हे मोदीच सांगू शकतात

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. मात्र, हा जामीन 1 जूनपर्यंत देण्यात आला आहे. आता या कालावधीत आणखी वाढ होईल की पुन्हा तुरुंगात जावे लागेल यावरून केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे. ईडी, सीबीआय आणि आयटीच्या आडून कारवाई करणाऱया आणि विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे राजकारण करणाऱया मोदींना केजरीवाल यांनी आरसाच दाखवला आहे. मला किती काळ तुरुंगात ठेवायचे हे मोदीच सांगू शकतात, असे महत्वपूर्ण भाष्य केजरीवाल यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले.

सध्या तुम्ही अंतरिम जामीनावर बाहेर आहात. तुरुंगात पाठवण्यात आलेले तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात, याबद्दल पत्रकाराने विचारले असता. सध्याच्या घडीला देश अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. आपला देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे, असे केजरीवाल म्हणाले.