शेतकऱ्याचे प्रसंगावधान ; बिहारात टळला रेल्वे अपघात, लाल टॉवेल दाखवून थांबविली भरधाव ट्रेन

बिहारमध्ये दोन शेतकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. हावडा-बिकानेर एक्स्प्रेस गया शहराच्या दिशेने जात असताना रेल्वे रुळ तुटलेले असल्याचे रुळाशेजारून जात असलेल्या शेतकऱ्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील लाल टॉवेल ट्रेन चालकाच्या दिशेने दाखवून इशारा केला. त्यामुळे सावध झालेल्या चालकाने गाडीचा वेग कमी करून गाडी थांबवली.

ट्रेन थांबल्यावर ग्रामस्थांनी लोको पायलटला तुटलेला रेल्वे रूळ दाखवला. तेव्हा लोको पायलटने याची खबर स्टेशनमास्तरांना दिली. त्यानंतर 45 मिनिटांनी हावडा-बिकानेर एक्स्प्रेस दुसऱ्या रेल्वेमार्गावरून रवाना झाली. ही घटना कैमूर येथे घडली.

पंडित दीनदयाल आणि गया रेल्वे मार्गादरम्यान, पुसौली रेल्ने स्टेशनपासून एक किलोमीटर पश्चिमेला कुदरा पोलीस ठाणे क्षेत्रातील घटाव गावातील दोन शेतकरी रेल्वे रुळाच्या दिशेने आपल्या शेताकडे जात होते. तेव्हा त्यांनी रेल्वेचा तुटलेला रुळ पाहिला. याबाबत पुसौली स्टेशनमास्तरांना ते माहिती देणार असतानाच अपलाइनवरील सिग्नल हिरवा झाला. त्यानंतर काही वेळातच अपलाइनवरून 2496 हावडा बिकानेर एक्स्प्रेस येताना त्यांना दिसली. त्यानंतर प्रेमचंद राम आणि राम प्रवेश या शेतकऱ्यांनी लाल टॉवेल दाखवून इंजिन ड्रायव्हरला इशारा दिला. त्यानंतर चालकाने ट्रेन थांबविली.

दरम्यान, आणीबाणीच्या प्रसंगी शेतकऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक करीत रेल्वेने त्यांना सन्मानित केले. त्या शेतकऱ्यांमुळे मोठा अपघात टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हावडा-बिकानेर ही ट्रेन अपघातातून वाचल्यानंतर दुसऱ्या लाइनवरून 45 मिनिटांनी रवाना करण्यात आली. तसेच, येथील रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, येथील रुळ दुरुस्त करण्यात आले असून, आता रेल्वे वाहतूक सामान्यपणे सुरू होऊ शकते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या