जिह्यात अवैध वाळू उपसा करणाऱया वाळू माफियांवर महसूल यंत्रणा कारवाई करत असली तरी वाळूमाफियांचे धाडस कमी होताना दिसत नाही. त्यातच कारवाई करणाऱया अधिकाऱयांवर हल्ले होत आहे. तरसोद फाटा-नशिराबाददरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांच्या पथकावर सात ते आठ वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने उपजिल्हाधिकारी कासार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक संशयितास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोघांसह शासकीय वाहनाने (एमएच 28 सी 6421) गेले होते. यावेळी त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर दिसले. यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेले. मात्र पथकाने या डंपरचा पाठलाग करून पकडले. मात्र त्याठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. यात कासार यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली.