साडेपाच महिन्यांत ४३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

18
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मराठवाडा विभागातील शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी, घेतलेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, त्यातच कर्जमाफीला झालेला विलंब अशा अनेकविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळेच साडेपाच महिन्यांत विभागातील ४३३ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्येच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत.

मराठवाडय़ात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे घेतलेल्या पिकांची गुणवत्ता खालावते आणि उत्पन्नात घट होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या कष्ठाचा योग्य मोबदलाही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. साडेपाच महिन्यांच्या कालावधीमध्ये ४३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली.

आत्महत्या केलेल्या ४३३ प्रकरणांपैकी सरकार दरबारी २०९ शेतकरी आत्महत्या शासन मदतीस पात्र ठरल्या असून १०१ अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत केली जाते, असा दावा सरकार करीत असले तरी सरकारचा हा दावा पोकळ आहे. ही १२३ आत्महत्येची प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवल्याने स्पष्ट होत आहे. विभागात सर्वाधिक बीड जिह्यात ८१ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. संभाजीनगर – ६७, धाराशिवमध्ये ६४, परभणी – ५५, जालना – ५३, नांदेड – ४०, लातूर – ४२, हिंगोली – ३१ अशा एकूण ४३३ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या