ललित पाटील प्रकरणात ससूनमधील डॉ. प्रवीण देवकाते गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रग्जतस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवकाते यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ललितला मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी न्यायालयाने डॉ. देवकाते यांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

चाकण येथे मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता. आजारी असल्याचा बहाणा करुन ललित ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. ललित ससूनमध्ये उपचार घेत असताना ललित, साथीदार अरविंदकुमार लोहरे, त्याचा भाऊ भूषण, अभिषेक बलकवडे यांनी नाशिक परिसरातील शिंदे गावात मेफेड्रोनची निर्मिती करण्यासाठी कारखाना सुरू केला होता. ससून रुग्णालयातून ललित मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 29 सप्टेंबर रोजी ससून परिसरात कारवाई करून त्याच्या दोन साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून दोन कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ललित 2 ऑक्टोबर रोजी ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केल्यानंतर ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते, येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अटक करण्यात आली. तपासात डॉ. मरसाळे यांनी ललितला ससून रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्याचे पत्र दिल्याचे निष्पन्न झाले. डॉ. मरसाळे यांच्या अटकेनंतर आता गुन्हे शाखेने डॉ. देवकाते यांना अटक केली.