राज्यात 15 हजार 931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 8840 जणांची महानगरपालिका निवडणुकीतून माघार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या 2869 जागांसाठी तब्बल 15 हजार 931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी 33 हजार 427 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 24 हजार 771 अर्ज छाननीत वैध ठरले. त्यापैकी 8840 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता 15 हजार 931 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

राज्यातील मागील साडेतीन-चार वर्षांपासून रखडलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांबरोबर राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह राज्यातील एकूण 2 हजार 869 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असून 15 हजार 831 उमेदवार नगरसेवकपदासाठी आपले नशीब अजमावणार आहेत.

 या महानगरपालिकांत निवडणूक

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पिंपरी-चिंचवड, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, नागपूर, चंद्रपूर,  अमरावती, अकोला, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, जालना.

मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक उमेदवार

मुंबईतील 227 जागांसाठी 1700 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ पुण्यातील 165 जागांसाठी 1166, नागपूर 151 जागांसाठी 993, छत्रपती संभाजीनगर 859, नाशिक 735, पिंपरी-चिंचवड 692, अमरावती 661, ठाणे 656 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

 

महापालिकांची संख्या     29

एकूण प्रभाग –  893

एकूण जागा – 2,869

महिलांसाठी जागा – 1,442

अनुसूचित जातींसाठी जागा – 341

अनुसूचित जमातींसाठी जागा – 77

ओबीसी प्रवर्गासाठी जागा – 759