खेळाडू भरतीच्या यादीत मल्लखांबाचा समावेश करा…

खेळाडू भरतीच्या यादीत मल्लखांबाचा समावेश करा सुनील शिंदे यांची विधान परिषदेत मागणी राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱया अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती दिली जाते. थेट नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या खेळांच्या यादीमध्ये मल्लखांब या खेळाचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी आज विधान परिषदेमध्ये केली. सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे हा मुद्दा सभागृहात मांडला. थेट नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या खेळांच्या यादीमध्ये मल्लखांब खेळाचा समावेश नाही. त्यामुळे 2019 मधील पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत वैयक्तिक चार सुवर्ण व दोन कास्य पदके पटकावून महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्ज्वल करणाऱया आणि 2021 च्या ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त हिमानी परब हिला शासकीय सेवेत थेट नियुक्ती मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे, असे आमदार शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हिमानी परब हिची कामगिरी पाहता तिला थेट शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.