
वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी सरकारकडे भरणा करावे लागणारे चालान देण्यासाठी महसूल सहायक दिलीप त्रिभुवन यास निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याच्यासाठी तब्बल 5 लाखांची लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर या दोन लाचखोरांना अटक करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या तीसगाव येथील गट नंबर 225/5 मध्ये 6 एकर 16 गुंठे ही वर्ग 2 ची जमीन दोघा जणांनी भागीदारीत विकत घेतली. सरकारच्या परवानगीने आणि नियमानुसार या जमिनीचे खरेदीखत 2023 मध्ये करण्यात आले. मात्र, ही जमीन वर्ग 2 मध्ये असल्याने या जमिनीला वर्ग 1 मध्ये आणण्यासाठी सरकारकडे शुल्क भरणा करावे लागते. यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यवाही करुन चालान देतात. हे चालान देण्यासाठी जमीन मालकाकडे तब्बल 18 लाख रुपयांची लाच मागण्यात आली. महसूल सहायक दिलीप त्रिभुवन याने निवासी उपजिल्हाधिकार्यांशी बोलून तडजोड करून लाचेची रक्कम कमी करता येईल का, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या जमीन मालकाला सांगितले आणि चालानसाठी कार्यवाही करण्यापूर्वी 5 लाख आणि त्यानंतर उर्वरित लाचेची रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार 26 मे रोजी ठरल्याप्रमाणे 5 लाख रुपये घेऊन जमीन मालक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे सापळा लावला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठरल्याप्रमाणे 5 लाखांची लाच घेताना दिलीप त्रिभुवन यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याचा मोबाईल आणि जवळील साहित्य ताब्यात घेतल्यानंतर पथकाने निवासी उपजिल्हाधिकार्यांच्या दालनात धडक मारली आणि लाच प्रकरणात ताब्यात घेतले. यावेळी त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, दिलीप साबळे, सुरेश नाईकनवरे, पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पो.नि. धस, केशव दिंडे, पो.नि. चेनसिंग घुसिंगे, राजेन्द्र सिनकर, इंगळे, अनवेज शेख, युवराज हिवाळे, घुगरे, काळे, जिवडे, कंदे, डोंगरदिवे, इंगळे, राम गोरे, बनकर, नागरगोजे यांच्या पथकाने यशस्वी केली.
आरडीसींच्या दालनात 75 हजार सापडले!
जमीन मालकाकडून 5 लाखांची लाच स्वीकारताना दिलीप त्रिभुवन याला पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरडीसी म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यास त्याच्या दालनातून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडील आयफोन जप्त केल्यानंतर झाडाझडती घेण्यात आली. यावेळी पथकाला 75 हजार रुपये रोख आढळून आले. कुठलाही अधिकारी स्वत:कडे किंवा दालनात एवढी मोठी रक्कम ठेवत नसल्याने आता झाडाझडतीत सापडलेल्या या 75 हजारामुळे विनोद खिरोळकर गोत्यात येणार आहे. ही रक्कम नेमकी कशाची आणि कुणी दिली, याची माहिती खिरोळकर याच्या चौकशीनंतर समोर येणार आहे.
घरात अर्धा किलो सोने, 13 लाख रोख रक्कम सापडली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला ताब्यात घेतल्यानंतर पथकाने खिरोळकरच्या घराची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमध्ये सोने, चांदी, रोख रक्कम असे मोठे घबाड सापडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकार्यांच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या मौल्यवान वस्तूमध्ये 589 ग्रॅम किमतीचे 50 लाख 99 हजार 583 रुपयांचे सोन्याचे दागिने, 13 लाख 6 हजार 380 रुपये रोख रक्कम, 3 किलो चांदीचे दागिने (किमत 3 लाख 39 हजार 345) असा एकूण 67 लाख 45 हजार 308 रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू आढळल्या. हे सर्व साहित्य पथकाने ताब्यात घेतले आहे.