
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटातील चंगेज खान यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ‘शिवसेनेत सुरू असलेलं इनकमिंग हे सत्ता आणण्याच्या दिशेनं चाललेलं आहे. सगळी लढवय्ये माणसं नीतिशून्य राजकारण गाडून टाकण्यासाठी माझ्यासोबत आपल्या शिवसेनेत येत आहेत’, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
चंगेज खान यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी पक्षातून बाहेर पडणारे आणि पक्षात प्रवेश करणारे असे दोन्ही प्रवाह पाहायला मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘इनकमिंग आणि आऊट गोइंग सुरू आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, आऊट गोइंग कशासाठी आहे ते अगदी स्पष्ट आहे. पण माझ्यासाठी इनकमिंगचं महत्त्व जास्त आहे. ते केवळ माझ्याकडे येता आहेत म्हणून नाही तर आऊट गोइंग सत्तेच्या दिशेनं चाललेलं आहे आणि इनकमिंग हे सत्ता आणण्याच्या दिशेनं चाललेलं आहे’. पुढे बोलताना, ‘काल एकनाथ पवार भाजपमधून आले, आज चंगेज खान आले आहेत. असे अनेक जण येत्या आणखी काही दिवसात येणार आहेत. त्यासगळ्यांनाच आज राजकारणात काय आजचा खेळखंडोबा झाला आहे, नीतिमत्ताशून्य असं राजकारण झालेलं आहे ते पटत नाहीये. अशी सगळी लढवय्ये माणसं हे असलं राजकारण गाडून टाकण्यासाठी माझ्यासोबत आपल्या शिवसेनेत येत आहेत’, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
शपथा घेण्यापेक्षा मार्ग काढून मोकळे का नाही झालात?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण दसरा मेळाव्यात बोलल्याचं सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, खूप लोकांनी त्याच्यावर बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणानं मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल त्यादिशेनं आता विचार करण्याची गरज आहे. कुणी कुणाला विचारतंय, कुणी काही बोलतं असा विचका करू नये. नेमकेपणानं काम करून मराठा समाजाला न्याया दिला गेलाच पाहिजे, ही आपली मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याच सोबत धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे, आदिवासी अस्वस्थ आहेत, ओबीसी समाज आहे त्यांना विश्वासात घेऊन आरक्षण द्यावं. मराठा समाज देखील दुसऱ्या कुणाच्या हक्काचं मागत नाही तो त्यांचा न्यायहक्क मागतो आहे. मात्र तो देताना दुसऱ्यांचं खेचून घेऊन त्यांना दिला जाईल असा काही संभ्रम निर्माण केला जात आहे तो मोडायचा असेल तर लोकसभेत खास अधिवेशन घेऊन सोयीसवलती, आरक्षण आणि न्यायहक्कांपासून वंचित आहे त्याचा सर्वसमावेशक विचार केला जावा असं आपलं मत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतल्याच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शपथ जरूर घ्या, पण तुमच्याकडे मार्ग काय तो त्यांना समजवून सांगा. शपथ घेणं हा एक भावनिक प्रकार झाला. पण शपथ घेऊन वेळ काढणं हा मार्ग नाही. जरांगे पाटीलांनी 40 दिवस दिले होते, त्यावेळी शपथेला जागून त्यांना न्यायहक्क देण्याची गरज होती, पण ते दिलं नाही’.
‘शपथ घेतली त्याचा आदर आहे, पण मार्ग काय आहे तो त्यांना समजवून सांगा. आम्हाला पण बोलवू नका. जरांगे पाटलांना बोलवा अन्य मराठा समाजेचे लढवय्ये नेते आहेत त्यांना बोलवा आणि मार्ग काय आहे तो दाखवा. मार्ग आहे तर काढत का नाही? दीड वर्ष झालं आता… शपथा घेण्यापेक्षा मार्ग काढून मोकळे का नाही झालात?’, असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
पंतप्रधानांनी जरांगे पाटलांची भेट घ्यावी!
‘पंतप्रधान महाराष्ट्रात आले आहेत, त्याचं स्वागत आहे. पण त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.



























































