कधी जोरदार, कधी रिमझिम; पावसाचा ब्रेकडान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेल्या दोन दिवसांपासून पाऊस मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्याआधी पूर्णपणे गायब झालेला पाऊस परतला खरा, पण तो मधून जोरदार तर कधी रिमझिम असा ब्रेकडान्स करत पाऊस पडतो आहे. त्याच्या अशा कोसळण्यामुळे मुंबईत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, कोकणात सिंधुदुर्ग जिह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढचे चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत आहे, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी दिली. पुढच्या आठवडय़ात मुंबईसह उपनगरांमध्ये चांगला पाऊस पडेल, असेही त्यांनी सांगितले. मान्सूनने १७ दिवसआधीच संपूर्ण देश व्यापला आहे, असे हवामान विभागाने जाहीर केले.

  • येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
  • मुंबईत हवामान ढगाळ राहाणार. अधूनमधून पावसाची मोठी सर येण्याची शक्यता.
  • मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तुलसी, विहार, भांडुप कॉम्प्लेक्स, भातसा, मध्य वैतरणा, तानसा, अप्पर वैतरणा आणि वैतरणा या तलावांमध्ये चांगला पाऊस.