दादरच्या उद्यानांमधील गैरसोयी दूर करा! शिवसेनेने पालिका अधिकाऱयांसोबत केली पाहणी

शिवसेनेच्या मागणीनुसार दादरच्या उद्यानांमधील समस्या व नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱयांनी उद्यानांची पाहणी केली. या उद्यानांमधील गैरसोयी दूर करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने यावेळी करण्यात आली. सर्व समस्या, तक्रारी व नागरिकांच्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करू, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.

माहीम विधानसभेचे विभागप्रमुख-आमदार महेश सावंत व शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्या मागणीनुसार महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख रवींद्र नलगे यांनी दादर पश्चिम येथील चित्रकार दीनानाथ दयाळ उद्यान, केशवराव दाते बालउद्यान व महिला व्यायामशाळा तसेच संगीतकार वसंत प्रभू उद्यान येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी उद्यानांमधील विविध समस्या, अडथळे तसेच नागरिकांच्या सूचना अधिकाऱयांसमोर मांडल्या.

या पाहणीवेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, शाखा समन्वयक रविकांत पाडयाची,  चंद्रकांत झगडे, उपशाखाप्रमुख संदीप अप्पा पाटील, विजय लोखंडे, शेखर यादव, गटप्रमुख केदार मुळगावकर, समीर म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोडकळीस आलेले बेंच, बंद सीसीटीव्ही 

चित्रकार दीनानाथ दयाळ उद्यान येथे दिवाबत्ती कार्यरत नाहीत, बसण्याचे बेंचेस मोडकळीस आल्या आहेत तसेच सीसीटीव्ही पॅमेरे कार्यरत नाहीत. केशवराव दाते बालउद्यान व महिला व्यायामशाळा येथे लहान मुलांच्या खेळण्यांचे साहित्य मोडकळीस आलेले आहे.  संगीतकार वसंत प्रभू उद्यानात झाडांच्या फांद्या कोसळत आहेत तसेच संपूर्ण उद्यानात माती टाकण्याची आवश्यकता आहे याकडे उद्यान विभागाच्या अधिकाऱयांचे लक्ष वेधले. त्यावर तातडीने कार्यवाही करून आवश्यक कामे सुरू करण्याचे आश्वासन उद्यान विभागप्रमुख रवींद्र नलगे यांनी दिले.