ऋषभ पंतचे अनधिकृत कसोटीमधून पुनरागमन

बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्स स्टेडियमवर हिंदुस्थान ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमध्ये पहिला अनधिकृत कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यातून टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पुनरागमन केले. पहिल्या दिवसाच्या अखेरीस पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने 9 बाद 299 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्डन हरमन (71), जुबैर हम्जा (66) आणि रुबिन हरमन (54) यांनी अर्धशतके झळकावली.

हिंदुस्थानकडून ऑफस्पिनर तनुष कोटियानने प्रभावी गोलंदाजी करत 4 बळी टिपले. मानव सुथारने 2, तर खलील अहमद, गूरनूर बरार आणि अंशुल पंबोज यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला. आयुष बदोनीला एकही विकेट मिळाली नाही.

ऋषभ पंत इंग्लंडविरुद्ध जुलै महिन्यात झालेल्या टेस्ट मालिकेच्या चौथ्या सामन्यात फलंदाजीदरम्यान जखमी झाला होता. पहिल्या डावात क्रिस वोक्सच्या चेंडूने त्याच्या पायावर मार बसल्याने तो रिटायर्ड हर्ट झाला होता. त्यानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी उतरला आणि अर्धशतक झळकावून हिंदुस्थानला 350 च्या पुढे नेले होते.

सामना संपल्यानंतर झालेल्या तपासणीत पायाला प्रॅक्चर असल्याचे समोर आले आणि त्यामुळे तो मालिकेतील शेवटचा टेस्ट व त्यानंतरचे सामने गमावले. त्याच्या जागी ध्रुव जुरेलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंतने अखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनधिकृत कसोटीमधून पुनरागमन केले.