‘विराट’सेनेपुढे बांगलादेशची कसोटी, हिंदुस्थान-बांगलादेश पहिली टेस्टआजपासून

758

टी-20 क्रिकेट मालिकेत 2-1 फरकाने बाजी मारलेल्या ‘टीम इंडिया’पुढे उद्यापासून बांगलादेश संघाची खरी ‘कसोटी’ लागणार आहे. रथी-महारथी खेळाडूंनी सजलेल्या ‘विराट’सेनेपुढे प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत दुबळ्या बांगलादेशचा कितपत निभाव लागतो हे बघावे लागेल. इंदूरमधील होळकर स्टेडियमवर लाल चेंडूवर सलामीचा कसोटी सामना होणार असला तरी सध्या चर्चा कोलकातामध्ये गुलाबी चेंडूवर होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याचीच अधिक रंगताना दिसत आहे. ‘टीम इंडिया’ मायदेशातील या दोन सामन्यांच्या कसोटीत मालिकेत 120 गुणांची कमाई करण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरेल. सध्या जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेत हिंदुस्थानी संघ 240 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

कोहली, पुजारा, रहाणे फॉर्ममध्ये

कर्णधार विराट कोहलीने 26 कसोटी शतके झळकाविली असून अजिंक्य रहाणेच्या नावावर 11, तर चेतेश्वर पुजाराच्या नावावर 18 कसोटी शतके आहेत. त्यामुळे मुस्ताफिजुर रहमान, तैजुल इस्लाम व मेहदी हसन मिराज व मेहदी हसन या बांगलादेशी गोलंदाजांचा हिंदुस्थानी फलंदाजीपुढे कस लागणार आहे. शिवाय या त्रिकुटापूर्वी मयांक अग्रवाल व रोहित शर्मा यांनाही बाद करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

तमीम, शाकिबच्या गैरहजेरीत बांगलादेश कमजोर

तमीम इक्बाल व शाकिब अल हसन यांच्या गैरहजेरीत बांगलादेशचा संघ कमजोर झाला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा बांगलादेशचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये कायम उघडा पडला आहे. कर्णधार मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम व महमुदुल्लाह रियाद यांच्यावर बांगलादेशच्या फलंदाजीचा भार असेल. अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाने त्यांना मागील कसोटीत हरवले आहे. शाकिब अल हसन दोन वर्षांच्या बंदीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. अशा परिस्थितीत मागील कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला हरवणाऱ्या ‘टीम इंडिया’पुढे बांगलादेशचा चार दिवस तरी निभाव लागणार काय? हीच चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त

होळकर स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांच्या फायद्याची राहिली आहे. या मैदानाची सीमारेषा छोटी असून खेळपट्टी उसळती आहे. मोहम्मद शमी व उमेश यादव या वेगवान जोडगोळीसह रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन फिरकीची जबाबदारी सांभाळतील. ‘चायनामन’ कुलदीप यादव व वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांच्यापैकी विराट कोहली कोणाला संधी देतो हे बघावे लागेल.

संघसहकाऱ्यांमधील समन्वय यशाचे रहस्य

‘मैदानावर उतरल्यानंतर शंभर टक्के योगदान दिल्यानंतरच कुठल्याही संघाला विजयात सातत्य राखता येते. इंदूरमध्ये आम्ही अद्यापि हरलो नसलो तरी बांगलादेशला कमी लेखण्याची चूक करणार नाही. त्यांच्याकडे प्रभावी गोलंदाज आहेत. ‘टीम इंडिया’तील खेळाडूंमध्ये कमालीचा समन्वय आहे. कदाचित हेच आमचे यशाचे रहस्य असेल.’

विराट कोहली, कर्णधार, टीम इंडिया

उभय संघ –

हिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, कुलदीप यादव. राखीव ः शुभमन गिल, हनुमा विहारी, रिषभ पंत.

बांगलादेश – मोमिनुल हक (कर्णधार), इमरूल काएस, मुश्फिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मोहम्मद मिथुन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, मुस्ताफिजुर रहमान, नईम हसन, सैफ हसन, शादमान इस्लाम, तैजुल इस्लाम, अबु जाएद, इबादत हुसैन, मोसद्देक हुसैन.

आपली प्रतिक्रिया द्या