#INDvSA पहिल्या कसोटीतून पंत आऊट’, साहा ‘इन’, अश्विनचेही पुनरागमन

782

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे सुरू होईल. पहिल्या लढतीमधून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला ‘अंतिम 11’मधून बाहेर ठेवण्यात आले असून त्याच्या जागी ऋद्धिमान साहा याची निवड करण्यात आली आहे. तसेच सलामीवीर रोहित शर्मा आणि फिरकी गोलंदाज आर. अश्विन हे दोघे कसोटीमध्ये पुनरागमन करणार आहेत.

सामन्यापूर्वी मंगळवारी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहील याने पत्रकार परिषद घेतली. यात त्याने पहिल्या कसोटीत पंतच्या जागी साहा यष्टीरक्षण करेन अशी घोषणा केली. साहा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक आहे, असे विराट त्याच्या कौतुकादाखल यावेळी म्हणाला. साहाने आपला शेवटचा कसोटी सामना गेल्यावर्षी जानेवारी 2018 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यानंतर खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो संघातून बाहेर फेकला गेला. दुखापतीनंतर त्याने आयपीएलद्वारे पुनरागमन केले, परंतु स्पर्धेदरम्यान तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला होता. आता तो दुखापतीतून सावरला असून बुधवारी आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरेल.

पंतला खराब खेळ भोवला

पंतला इंग्लंड दौऱ्यामध्ये पहिल्यांदा कसोटीत संधी मिळाली होती. 5 कसोटी सामन्यांच्या या लढतीत तिसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली होती. पंतने ओव्हलमध्ये 114 धावांची खेळी केली, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नाबाद 159 धावा केल्या. परंतु त्यानंतर पंतचे प्रदर्शन सातत्याने खराब होत गेले. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन कसोटीत पंतने फक्त 58 धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याला पहिला कसोटीच्या अंतिम 11 मधून बाहेर ठेवण्यात आले. पंत विंडिजविरुद्घ फ्लॉप होत असताना साहा राखीव खेळाडू म्हणून मैदानाबाहेर बसला होता.

अश्विन-रोहितचे 10 महिन्यानंतर पुनरागमन

पहिल्या कसोटीमध्ये रोहित शर्मा सलामीला येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मयांक अग्रवालसोबत तो डावाची सुरुवात करेन. तसेच अंतिम 11 मध्ये आर. अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. दोघेही 10 महिन्यानंतर कसोटीमध्ये पुनरागमन करणार आहेत. दोघांनी आपला शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), इशांत शर्मा, मोहम्मद शमी

आपली प्रतिक्रिया द्या