टी-20 वर्ल्ड कपची चाचणी, हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये पहिला टी-20 सामना हैदराबादमध्ये रंगणार

पुढल्या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपचा धमाका पाहायला मिळणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला अद्याप एक वर्ष बाकी असून त्याआधी सर्व संघांनी पूर्वतयारीसाठी कंबर कसली आहे. हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये उद्यापासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार असून यामध्ये उभय संघ टी-20 वर्ल्ड कपसाठी क्रिकेटपटूंची चाचणी करतील यात शंका नाही. विराट कोहलीचा टीम इंडियाचा संघ आणि कायरॉन पोलार्डचा वेस्ट इंडीज संघ यांच्यामध्ये होणारी झुंज म्हणजे टी-20 वर्ल्ड कपची रंगीत तालीम किंवा वर्ल्ड कपची तयारी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

पंत, राहुलचा कस लागणार

हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये खेळवण्यात येणाऱया मालिकेत रिषभ पंत व लोकेश राहुल या दोघांचा कस लागणार आहे. दरम्यान, यावेळी एखादा खेळाडू फॉर्मबाबत झगडत असेल तर त्याला त्याचा वेळ देणे ही आपल्या साऱयांची जबाबदारी आहे. जर रिषभ पंतने एखाद्या वेळी बाद करण्याची संधी दवडली तर लगेच स्टेडियममधून धोनीच्या नावाचा जयघोष करणे बरोबर नाही, अशी पाठराखण विराट कोहलीने रिषभ पंतची केली.

फ्रंटफूट नो बॉलचा निर्णय थर्ड अंपायरकडे

हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यामधील मालिकेतील फ्रंटफूट नो बॉलचा निर्णय मैदानातील पंच नव्हे तर थर्ड अंपायर घेतील अशी माहिती आयसीसीकडून गुरुवारी देण्यात आली.

हवाय फक्त एक वेगवान गोलंदाज

कर्णधार विराट कोहली याने लढतीच्या आदल्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी हे तिन्ही गोलंदाज चमकदार कामगिरी करताहेत. त्यामुळे पुढल्या वर्षातील वर्ल्ड कपसाठी आम्ही फक्त एका वेगवान गोलंदाजाचा शोध घेत आहोत.

संभाव्य संघ

हिंदुस्थान – रोहीत शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर.

वेस्ट इंडीज – एविन लुईस, लेण्डल सिमन्स, ब्रॅण्डन किंग, शिमरोन हेथमायर, कायरॉन पोलार्ड, दिनेश रामदीन, जेसन होल्डर, खॅरी पिअर/किमो पॉल, फॅबियन ऍलेन, हेडन वॉल्श ज्युनियर, शेल्डॉन कॉटरेल.

आपली प्रतिक्रिया द्या