हिंदुस्थानकडे मोठ्या आघाडीची संधी, विराट-रहाणे अर्धशतक ठोकून मैदानात

359

एंटीगामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी लढतीत टीम इंडियाकडे मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. तिसऱ्या दिवशी विंडीजचा डाव झटपट गुंडाळल्यानंतर हिंदुस्थानने दिवस अखेर तीन विकेट गमावून 185 धावा केल्या. पहिल्या डावाच्या बळावर टीम इंडियाची आघाडी आता 260 धावांची झाली आहे. खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोलही 51 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे 53 धावांवर नाबाद होतो. दोघांमध्ये 104 धावांची भागिदारी झाली आहे. चौथ्या दिवशी मोठी धावसंख्या रचून विंडीजपुढे अशक्यप्राय आव्हान ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.

तिसऱ्या दिवशी विंडीजचा डाव टीम इंडियाने झटपट गुंडाळला. विंडीजचा संपूर्ण संघ 222 धावांमध्ये गारद झाला आणि टीम इंडियाला 75 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. हिंदुस्थानकडून वेगवान गोलंदाज इशांत शर्माने सर्वाधिक पाच बळी घेतले. जाडेजा आणि शमीने प्रत्येकी दोन तर बुमराहने एक बळी घेतला.

दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब
हिंदुस्थानची पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावाचीही सुरुवात खराब झाली. मयांक अग्रवाल पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे बाद झाला. यानंतर राहुल चांगल्या सुरुवातीनंतरही खराब फटका मारून बाद झाला. त्यानंतर एका अप्रतिम चेंडूवर पुजाराचा त्रिफळा उडाल्याने हिंदुस्थानने 100 धावांमध्ये तीन गडी गमावले. यानंतर विराट आणि रहाणेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विंडीजला आणखी यश मिळवू दिले नाही. दोघांनीही संयमी आणि खराब चेंडूवर आक्रमक फलंदाजी करत वैयक्तीक अर्धशतक झळकावले. रहाणेचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. पहिल्या डावातही त्याने 81 धावांची दमदार खेळी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या