
टीम इंडियाने पहिल्या अँटिग्वा कसोटीत यजमान वेस्ट इंडिजला तब्बल 318 धावांनी पराभूत केले आणि विदेशी भूमीत मोठा ऐतिहासिक विजय संपादन केला. 417 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान विंडीजचा दुसरा डाव केवळ 100 धावांमध्ये आटोपला. किमयागारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 7 धावांत 5 तर इशांत शर्माने 3 विकेट घेत हिंदुस्थानला महाविजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱया ‘शतकवीर’ अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले.
पहिल्या डावातील छोटय़ाशा आघाडीनंतर दुसऱया डावात रहाणेचे शतक (102) आणि हनुमा विहिरीच्या 93 धावा या खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने विंडीजला विजयासाठी 417 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांची पार भंबेरी उडाली. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱयापुढे विंडीजचे फलंदाज हतबल झाले. त्यामुळे यजमान विंडीजच्या डावाची अवस्था 9 बाद 50 अशी झाली होती. शेवटच्या विकेटसाठी केमार रोच आणि कमिन्स यांनी 50 धावांची भागीदारी केली आणि विंडीजला 100चा आकडा गाठून दिला.
बुमराहने केले विंडीजला ‘गुमराह’
टीम इंडियाचा यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह याने 8 षटके टाकत केवळ 7 धावा खर्च करीत वेस्ट इंडीजचा निम्मा संघ गारद केला. त्याचे यॉर्कर आणि वळणारे चेंडू यजमान संघाच्या फलदाजांना पार गुमराह करून गेले. त्याच्या या कामगिरीच्या बळावर बुमराहने एक विक्रम रचला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीजमध्ये एका डावात 5 बळी टिपणारा बुमराह आशियातील पहिला गोलंदाज ठरला.
कसोटीत विराटच ‘दादा’ कर्णधार
पहिल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानने विंडीजचा तब्बल 318 धावांनी दारुण पराभव करत ‘विराट’ विजय साजरा केला. या विजयासह हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठय़ा विक्रमाची नोंद झाली आहे. देशाबाहेर सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 12 कसोटी विजय मिळवले. विराट कोहलीने 26 व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे. गांगुलीने 28 सामन्यांत 11 विजय मिळवले होते. विराट कोहलीने गांगुलीचा विक्रम मोडीत काढला आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थान टॉपवर हिंदुस्थानी संघाने यजमान विंडीज संघाला मोठय़ा फरकाने पराभूत करत आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.



























































