
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार विकेटने टीम इंडियाचा एकतर्फी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 126 धावांचे माफक आव्हान दिले होते. या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकांमध्ये यशस्वी पाठलाग केला आणि 4 विकेटने सामना जिंकला. कर्णधार मिचेश मार्श (46), ट्रेव्हिस हेड (28), जोश इंग्लिस (20) आणि मिचेल ओवेन (14) यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.
टीम इंडियाच्या महिला संघाने वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाचा फडशा पाडला आणि फायनलमध्ये धडक दिली. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, टीम इंडियाच्या पुरुष संघाने चाहत्यांना नाराज केले. आज (31 ऑक्टोबर 2025) मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाने दाणादाण उडवली. अभिषेक शर्मा (68) आणि हर्षित राणा (35) यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाची गाडी सर्वबाद 125 धावांवर थांबली. जोश हॅजलवुडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर बार्टलेट, नॅथन एलिस यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आणि मार्कस स्टॉयनिसने एक विकेट घेतली.
 
             
		





































 
     
    




















