मालिका विजयाची हॅटट्रिक, हिंदुस्थानची ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी मात

जगज्जेत्या संघातील सहा खेळाडू मायदेशी परतल्यामुळे दुबळय़ा झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाला हिंदुस्थानने अक्षर पटेलच्या फिरकीच्या जोरावर 20 धावांनी पराभूत केले आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत मालिका विजयाची हॅटट्रिकही साजरी केली. आता पाचवा सामना उद्या रविवारी बंगळुरूला औपचारिकता म्हणून खेळला जाईल.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हिंदुस्थानच्या फलंदाजांना 9 बाद 174 धावांवर रोखून सामन्यात रंगत आणली होती. या मालिकेत हिंदुस्थानचा संघ पहिल्यांदाच दोनशेच्या आत गडगडला होता. पण हिंदुस्थानचे 175 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवलेच नाही. ट्रव्हिस हेडने झंझावाती खेळ करत हिंदुस्थानच्या हृदयाचे ठोके वाढवले होते, पण हेड 31 धावांवर बाद झाल्यावर अक्षर पटेलच्या फिरकीसमोर एकही ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर थांबू शकला नाही. अक्षरने हेड, मॅकडरमॉट आणि हार्डीला बाद करून हिंदुस्थानला विजयासमीप नेले. शेवटी कर्णधार मॅथ्यू वेडने षटकार-चौकार ठोकत सामन्यात जीव ओतण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. पटेलने 3 तर दीपक चहरने 2 विकेट घेतल्या. रवी बिष्णोईने केवळ 17 धावा देत एक यश मिळविले.

त्याआधी संघात होलसेल बदल करून खेळत असलेल्या कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून क्षणाचाही विलंब न लावता हिंदुस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. एरॉन हार्डीने अफलातून सुरुवात करताना यशस्वी जैसवालला पहिले षटक अक्षरशः खेळवले. पहिले षटक निर्धाव खेळणाऱ्या यशस्वीला दुसऱ्या षटकात सूर गवसला आणि त्याने ऑस्ट्रेलियावर जोरदार हल्ला चढवला. सहा षटकांत 50 धावांची सलामी दिली, पहिली विकेट गेल्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजीला घसरणही लागली आणि धावांची गती मंदावली. श्रे

यस अय्यर (8) आणि सूर्यकुमार यादवने (1) निराशा केल्यानंतर मैदानात उभा असलेल्या ऋतुराज गायकवाडचाही संयम सुटला. तो 32 धावांवर बाद झाला. हिंदुस्थानने 14 षटकांत 115 धावा केल्या होत्या. तेव्हा रिंकू सिंग मैदानात आला. त्याने जितेश शर्माच्या साथीने धावांचा वेग वाढवला. दोघे हिंदुस्थानला दोनशेपार नेणार असे वाटत होते. पण 56 धावांची भागी रचून ही जोडी फुटली आणि हिंदुस्थानने धावा काढण्याऐवजी आपल्या विकेटच गमावल्या.

रिंकूने आजही फटकेबाजी करताना 46 धावा चोपल्या तर जितेश शर्माने 3 षटकारांचा पाऊस पाडत 35 धावा ठोकल्या. शेवटच्या नऊ चेंडूंत 8 धावांत हिंदुस्थानचे पाच फलंदाज बाद झाले. त्यामुळे फलकावर केवळ 174 धावाच लागल्या.