
सामना ऑनलाईन । मुंबई
बुधवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या अंतिम 11 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याची माहिती दिली आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत खराब कामगिरी करणारे सलामीवीर मुरली विजय आणि के.एल. राहुल यांना नारळ देण्यात आला आहे. तसेच फिरकीचा उस्ताद आर. अश्विनही दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
मेलबर्नमध्ये होणाऱ्या या चार कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीसाठी मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीमध्ये तो आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात करेल. टीम इंडियाकडून कसोटीमध्ये पदार्पण करणारा तो 295 वा खेळाडू असेल.
जाडेजा-रोहितचे कमबॅक
दुखापतीशी झुंझणारा आर. अश्विन या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याने अष्टपैलू फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेला संघात स्थान मिळाले आहे. तसेच दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकलेल्या रोहितलाही अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे.
मयांक-विहारी देणार सलामी
राहुल-विजयच्या खराब कामगिरीमुळे मेलबर्न कसोटीतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या कसोटीत पदार्पण करणारा मयांक अग्रवाल हनुमा विहारीसोबत सलामीला उतरेल. त्यामुळे या सामन्यात चांगली कामगिरी करत आपली जागा पक्की करण्याची नामी संधी दोन्ही खेळाडूंकड़े असणार आहे.
मालिका रोमांचक स्थितीत
टीम इंडियाने अॅडलेडमध्ये पहिली कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पर्थमधील दुसऱ्या कसोटीत 146 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 बरोबरी साधली. पर्थ कसोटीमध्ये हिंदुस्थानचा चार वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय चुकल्याचे दिसले होते. या सामन्यात अश्विन दुखापतीमुळे खेळू शकला नाही. याचा फटका टीम इंडियाला बसला. त्यामुळे सावधगिरी म्हणून टीम इंडियाने जाडेजावर जुगार खेळला आहे.
India name Playing XI for 3rd Test: Virat Kohli (C), Ajinkya Rahane (VC), Mayank Agarwal, Hanuma Vihari, Cheteshwar Pujara, Rohit Sharma, Rishabh Pant (WK), Ravindra Jadeja, Mohammed Shami, Ishant Sharma, Jasprit Bumrah #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/DImj8BVTj5
— BCCI (@BCCI) December 24, 2018
मेलबर्न कसोटीसाठी टीम इंडियाचे अंतिम 11 खेळाडू –
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह



























































