
हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सात जानेवारीपासून सिडनी येथे तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या कसोटीवर मात्र कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. सिडनीमध्ये शुक्रवारी कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. पण दोन देशांमधील तिसरी कसोटी सिडनीमध्येच होईल, असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरीम मुख्य कार्यकारी नीक हॉकली यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, आम्ही मेडीकल एक्सपर्टच्या सातत्याने संपर्कात आहोत. तसेच खेळाडूंना या मोसमात बायोबबलमध्ये ठेवलेले आहे. बिग बॅश लीग, महिला बिग बॅश लीग, ऑस्ट्रेलियन संघ, हिंदुस्थानी संघ या सर्वांनीच नियमांचे काटेकोरपणे पालन केलेले आहे. त्यामुळे आम्हाला तिसरी कसोटी सिडनी येथेच होईल याचा विश्वास आहे. पण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.





























































