
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कठिण परिस्थितीत असताना मैदानात येऊन जडेजाने (89) कर्णधार शुभमन गिलसोबत महत्त्वपूर्ण 203 धावांची भागी काली. याचसोबत त्याने World Test Championship मध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला. WTC मध्ये 2000 धावा करणारा आणि 100 हून अधिक विकेट घेणारा रविंद्र जडेजा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात टीम इंडियाने सर्वगडी बाद 587 धावा केल्या आहेत. परंतु एकवेळ टीम इंडियाची अवस्था 211 धावांवर पाच विकेट अशी होती. तेव्हा रविंद्र जडेजाने कर्णधार शुभमन गिलसोबत संयमी फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाला 500 पार जाण्यास मदत मिळाली. त्याने 137 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 1 षटकार ठोकत 89 धावांची खेळी केली. त्याची ही खेळी टीम इंडियासाठी फायदेशीर ठरलीच, पण त्याचबरोबर ऐतिहासिकही ठरली. कारण त्याने जागतीक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला. रविंद्र जडेजाने WTC मध्ये आतापर्यंत 41 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 40 च्या सरासरीने 2010 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या गोलंदाजीची जादू सुद्धा वेळोवेळी दाखवून दिली आहे. त्याच्या नावावर 132 विकेट आहे. त्याने आतापर्यंत 6 वेळा पाच विकेट घेण्याचा आणि 6 वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.