IND VS ENG 3rd TEST – इंग्लंडसमोर 521 धावांचे विराट आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - बीसीसीआय

सामना ऑनलाईन । नॉटिंगहम

नॉटिंगहम येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत हिंदुस्थानने आपला दुसरा डाव 7 बाद 352 धावांवर घोषित केला आहे. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर 521 धावांचे विराट आव्हान आहे. हिंदुस्थानकडून कर्णधार विराट कोहलीने 103, चेतेश्वर पुजाराने 72 आणि हार्दिक पांड्याने नाबाद 52 धावा फटकावल्या. हिंदुस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 23 धावा केल्या आहेत. खेळ थांबवण्यात आला तेव्हा कुक 9 आणि जेनिंग 13 धावांवर खेळत होता. इंग्लंडच्या संघाला अजूनही विजयासाठी 498 धावांची आवश्यकता आहे.

तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानने पहिल्या सत्रात एकही गडी गमावला नाही. लंचपर्यंत हिंदुस्थानकडे 362 धावांची आघाडी होती. या दरम्यान विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनीही अर्धशतक पूर्ण केले.

लंचनंतर स्टोक्सच्या गोलंदाजीवर पुजारा 72 धावांवर बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर अजिक्य रहाणे मैदानावर उतरला.  या दरम्यान हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटीतील आपले 23 वे शतक झळकावले असून विरेंद्र सेहवागच्या शतकांची बरोबरी केली आहे. सेहवागच्या नावावरही कसोटीत 23 शतकांची नोंद आहे. शतकानंतर विराट जास्तवेळ मैदानावर टिकू शकला नाही आणि वोक्सच्या गोलंदाजीवर 103 धावांवर तो पायचित झाला.

विराटनंतर रहाणे 29 आणि पंत 1 धावावर बाद झाला. अखेर पांड्याने तुफानी खेळ करत हिंदुस्थानला मोठी आघाडी मिळवून दिली. पांड्याचे अर्धशतक झाल्यानंतर विराटने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. सामन्याचे अद्यापही दोन दिवस असून हिंदुस्थानला विजयाची सुवर्णसंधी आहे.