
118 चेंडूंत नाबाद 133 धावांची खेळी , शेवटच्या सत्रात ठोकल्या 176 धावा, हिंदुस्थानच्या पहिल्या डावात 445 धावा
हिंदुस्थानच्या फलंदाजांनी पाच सत्रं गाजवल्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या बेन डकेटने 118 चेंडूंत नाबाद 133 धावांची ‘बॅझबॉल’ खेळी करून दुसऱया दिवसाच्या शेवटच्या सत्रात हिंदुस्थानी गोलंदाजांचीच विकेट काढली. डकेटच्या अभेद्य शतकामुळे इंग्लंडने दुसऱया दिवसअखेर 2 बाद 207 अशी आक्रमक सुरुवात करत हिंदुस्थानच्या फलंदाजांनी केलेल्या मेहनतीवर बुलडोझर फिरवला आहे.
गुरुवारच्या 5 बाद 326 या धावसंख्येत हिंदुस्थानच्या तळाच्या फलंदाजांनी 119 धावांची भर घातली. गुरुवारी पदार्पणवीर सरफराज अहमदने जोरदार खेळ केला तर आज ध्रुव जुरेलने दमदार पदार्पण करताना 46 धावा काढल्या. त्याने अश्विनसोबत आठव्या विकेटसाठी केलेल्या 77 धावांच्या भागीमुळेच हिंदुस्थानला चारशेचा टप्पा गाठता आला. आज हिंदुस्थानने तीनपेक्षा कमी सरासरीने 119 धावा काढल्या, तर इंग्लंडने 35 षटकांत सहाच्या सरासरीने 207 धावा फोडून काढल्या.
हिंदुस्थानी गोलंदाज निष्प्रभ
हिंदुस्थानी फलंदाजांनी 445 धावा काढल्यानंतर इंग्लिश फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी गोलंदाजांची होती, पण हिंदुस्थानचे सारेच गोलंदाज बेन डकेटला रोखण्यात अपयशी ठरले. डकेटचा हल्ला इतका जबर होता की, त्याने टी-20 क्रिकेटला साजेशी फलंदाजी करत हिंदुस्थानी गोलंदाजांना एकाच सत्रात सळो की पळो करून सोडले. डकेटने शेवटच्या सत्रात 96 चेंडूंत 17 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी करत 114 धावा चोपून काढल्या. डकेटच्या शतकी हल्ल्यामुळे हिंदुस्थानच्या 445 धावाही कमी वाटू लागल्या. बुमरा असो किंवा सिराज, अश्विन असो किंवा जाडेजा, सारेच डकेटसमोर फिके ठरले.
डकेटची डकैती
दुसऱया सत्रात हिंदुस्थानचा डाव आटोपल्यावर इंग्लंडने सहा षटके खेळून बिनबाद 31 धावा केल्या होत्या. मात्र चहापानानंतर बेन डकेटने असा स्फूर्तिदायक खेळ केला की, तो पाहून सारेच ‘वाह डकेट’ म्हणाले. त्याने एका बाजूने हिंदुस्थानची गोलंदाजी अशी फोडून काढली की, त्याच्या बॅटला लागलेला चेंडू सीमापारच जात होता. त्याने 39 चेंडूंतच आपले अर्धशतक साजरे करताना चक्क 11 चौकार ठोकले. म्हणजेच 44 धावा त्याने चौकारानिशी काढल्या. मग त्याने आपली शंभरीसुद्धा 88 व्या चेंडूवर पूर्ण केली. यातही 19 चौकार आणि 1 षटकार मारला. म्हणजे 100 पैकी 82 धावा चौकार-षटकाराच्याच. हे त्याचे तिसरे कसोटी शतक होय. त्याची ही फटकेबाजी शेवटच्या क्षणापर्यंत अशीच सुरू होती. डकेटने झॅक क्राऊलीसह 89 धावांची सलामी दिली. यात क्राऊलीचा वाटा 15 धावांचा होता. त्यानंतर ओली पोपबरोबर 93 धावांची भागी रचली. यात पोपने 39 धावा काढल्या, तर दिवसअखेर ज्यो रुटसह नाबाद 25 धावांची भागी केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिसऱया सत्रात 29 षटकांच्या खेळात इंग्लंडने 176 धावा ठोकून काढल्या. विशेष म्हणजे या धावांमध्ये षटकार-चौकारांचा वाटा 118 धावांचा होता. 25 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी शेवटच्या सत्रात बेन डकेट आणि टीमने करत आपल्या ‘बॅझबॉल’चा हिंदुस्थानी गोलंदाजांनी तडाखा दिला.
जुरेलचे सुरेल पदार्पण
हिंदुस्थानचा यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करणाऱया ध्रुव जुरेलने 46 धावांची सुरेल खेळी साकारत निवड समितीने दिलेल्या संधीचे सोने केले. ध्रुवने सरफराजसारखी आक्रमक फलंदाजी केली नाही, पण त्याने संयमी खेळ करत अश्विनसह केलेल्या भागीमुळेच हिंदुस्थानने चारशेपार मजल मारली. जुरेलचे पदार्पण अर्धशतक मारण्याचे स्वप्न अवघ्या चार धावांनी हुकले. त्याने तब्बल 143 मिनिटे झुंजार खेळ करत 104 चेंडूंत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 46 धावा केल्या. तळाला जसप्रीत बुमरानेही 26 धावांची खेळी करत संघाला 445 पर्यंत नेले. गुरुवारी 110 धावांवर खेळत असलेला रवींद्र जाडेजा 112 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी आपल्या बॅटची कमाल दाखवली. त्यामुळे दोन सत्रांतील 44.5 षटके खेळून केवळ 119 धावाच काढता आल्या. मार्क वूडने बुमराला पायचीत करत डावातील चौथा विकेट घेतला. त्याने 114 धावांत 4 विकेट घेतले.
कौटुंबिक कारणामुळे अश्विनची माघार
आपल्या 500 कसोटी विकेटचा विक्रम करणाऱया रविचंद्रन अश्विनने कौटुंबिक कारणामुळे तिसऱया कसोटीतून माघार घेतली आहे. आता उर्वरित कसोटी सामन्यात हिंदुस्थानी संघाला दहा खेळाडू आणि एका बदली खेळाडूसहच खेळावे लागणार आहे. या मालिकेत आतापर्यंत हिंदुस्थानच्या विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांना माघार घ्यावी लागली आहे.




























































