
>>संजय कऱ्हाडे
देशाचा पराभव समोर दिसतो तेव्हा विचारात दृढता अन् स्पष्टता असावी लागते. देशाच्या इभ्रतीचा प्रश्न असतो तेव्हा जीव अन् प्राण एकत्र करावा लागतो. मग तुम्ही सीमेवर असा की खेळाच्या मैदानावर!
311 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर आणि पहिल्याच षटकात धावांच्या आधी बाद फलंदाजांची संख्या लागल्यावर दातओठ खाऊन राहुल आणि कप्तान गिलने तेच केलं. आपली जान-जिगर पणाला लावली. त्यांचे विचार आणि पदलालित्य स्पष्ट होतं. मागच्या, पुढच्या दोन्ही पायांवरचे दोघांचेही ड्राईव्हज् अधिकारवाणीने फटकावलेले होते. दरम्यान, गिलला कार्सच्या गोलंदाजीवर डॉसनने जीवदान दिलं…
इंग्लंडने मात्र प्रतिस्पर्ध्याला आधी टाचेखाली घ्या, मग चिरडून टाका, हे रवी शास्त्राrचं ब्रीदवाक्य शिरोधार्य मानलं. दुसरा हेडिंग्लेचा कसोटी सामना जिंकताना कप्तान गिलने याच तत्त्वावर इंग्लंडला चिरडलं होतं अन् काल मँचेस्टरला कप्तान बेन स्टोक्सनेही हिंदुस्थानी संघाला ठेचताना वेगळा न्याय लावला नाही.
लॉर्ड्स कसोटीपासून बेन स्टोक्स नावाच्या वादळाने जणू हिंदुस्थानच्या फलंदाजांना, गोलंदाजांना पालापाचोळय़ासारखं उडवून लावलंय. त्याची गोलंदाजी आपल्या फलंदाजांना चक्रावून गेली. त्याने पाच बळी घेतले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीने आपल्याला विजांचा कडकडाट ऐकवला आणि त्याच्या फेकाRनी आपल्या धावा घेण्याच्या प्रयत्नात असणाऱया फलंदाजांचे पाय थिजवले. इतपं कमी म्हणून, लॉर्ड्सवर ज्या ऋषभचे पाय स्टोक्सने थिजवले त्याच ऋषभने इथे मँचेस्टरला वोक्सच्या यॉर्करवर उलटा झाडू फिरवण्याचा बावळटपणा करून आपला पाय स्वतःहून जायबंदी करून घेतला!
मोठे मोठे उसासे टाकत, छातीवर धोंडा ठेवून, दमछाक करत हिंदुस्थानी संघाने कशाबशा 358 धावा जमवल्या होत्या आणि इंग्लंडच्या डकेट (94) क्रॉली (84) या सलामीवीरांनी दणदणीत 166 धावांची भागीदारी करताना बॅझबॉल नावाची खोल जखम आपल्याला दिली. त्यावर ज्यो रूट (150) आणि बेन स्टोक्सने (141) तिखटमीठ चोळलं.
असो, चहापानापर्यंत एकोणतीस षटकांत हिंदुस्थानने 2 बाद 86 धावा केल्यात. आता थोडी कळ सोसणं आवश्यक आहे. धैर्यधराची भूमिका निभावली आणि टाचा उंचावून पाहिलं तर दयावान वरुणराजा वळणावरच दिसतोय!