
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या अॅण्डरसन-तेंडुलकर मालिकेतील पाचवा कसोटी सामना लंडनच्या ओव्हलमध्ये खेळला जाणार आहे. सध्या इंग्लंडने 2-1 अशी मालिकेत आघाडी घेतली आहे. चौथा कसोटी सामना अनिर्णीत सुटल्यामुळे पाचवा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा हादरा बसला असून इंग्लंडचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पाचवा कसोटी सामना खेळणार नाहीये.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) ट्वीटरवर पोस्ट करत बेन स्टोक्स पाचव्या कसोटीमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली. दुखापतीमुळे बेन स्टोक्स पाचवा कसोटी सामना खेळणार नाही. तसेच पाचव्या कसोटी सामन्यासाठी ऑली पोपची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात चार बदल करण्यात आले आहेत. परंतु बेन स्टोक्स नसल्यामुळे इंग्लंडच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच बेन स्टोक्सच न खेळणं टीम इंडियाासाठी फायदेशीर ठरू शकतं. बेन स्टोक्सचा खेळ मालिकेतील चार कसोटी सामन्यांमध्ये धमाकेदार राहिला आहे. त्याने चार कसोटी सामन्यांमधील 7 डावांमध्ये 43.42 च्या सरासरीने 304 धावा केल्या असून यामध्ये एका शतकाचा (141) सुद्धा समावेश आहे. तसेच धारधार गोलंदाजीने त्याने 17 विकेट घेतल्या आहेत. 72 धावा देत 5 विकेट हे त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन राहिलं आहे. विशेष म्हणजे बेन स्टोक्सने पहिल्यांदाच एखाद्या मालिकेत इतक्या विकेट घेतल्या आहेत.
पाचवा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. इंग्लंडने 2-1 अशी मालिकेत आघाडी घेतल्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकून 3-1 अशा फरकाने मालिका खिशात घालण्यासाठी इंग्लंड प्रयत्नशील असेल. तर टीम इंडियाला पाचवा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे गरजेचं आहे. जर टीम इंडियाने पाचवा कसोटी सामना जिंकला तर, मालिका अनिर्णीत सुटेल. पण जर टीम इंडियाने सामना गमावला किंवा सामना अनिर्णीत सुटला तर, इंग्लंड मालिका जिंकण्यात यशस्वी ठरेल.
Ben Stokes will miss out on the final Test of the series with a right shoulder injury ❌
And we’ve made four changes to our side 👇
— England Cricket (@englandcricket) July 30, 2025
ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडचा संघ
ऑली पोप (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), क्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग