
>>संजय कऱ्हाडे
1994 साली बार्ंमगहॅमला त्या दिवशी वॉर्विकशायरतर्फे खेळताना ब्रायन लारा 18 वर असताना डरहॅमचा यष्टिरक्षक क्रिस स्कॉटने त्याचा झेल सोडला आणि लाराने 501 धावांचा विक्रम नोंदवला. फर्स्ट क्लास क्रिकेटमधली सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या! 1999 मध्ये वर्ल्ड कपच्या सुपर सिक्स सामन्यात हर्षल गिब्सने स्टीव वॉचा झेल सोडला, वॉने शतक ठोकलं आणि मग ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला! क्रिस स्कॉट आणि हर्षल गिब्सची मनःस्थिती त्या त्या दिवशी नेमकी कशी झाली असेल हे काल संध्याकाळी मोहम्मद सिराजला नक्की कळलं असेल!
हॅरिस ब्रूक 27 धावांवर खेळत असताना त्याने प्रसिद्धच्या आखूड टप्प्याच्या चेंडूला पूल केलं. चेंडू हवेत, चेंडू फाइन लेगला उभ्या असलेल्या सिराजच्या ओंजळीत उतरला, पण झेल घेतल्यावर तोल जाऊन सिराजचा पाय सीमारेषेबाहेर पडला! ब्रूक नाबाद, ब्रूकच्या आणि इंग्लंडच्या खाती अतिरिक्त सहा धावा जमा झाल्या! ठण-ठण!! धोक्याची घंटा तिथेच वाजली…
त्या क्षणी ज्यो रुट 23 धावांवर नाबाद होता आणि इंग्लंडला विजयासाठी तब्बल दीडशे धावांची गरज होती! क्रॉली, डकेट अन् कप्तान पोप बाद झालेले होते. अशा कातर वेळी ब्रूकला जीवदान मिळालं अन् म्हणूनच दिलाचा ठोका चुकला.
ब्रूकने मिळालेल्या जीवदानानंतर फक्त 91 चेंडूत धडाक्याने दहावं शानदार शतक झळकावल्यावर तो बाद झाला! तोपर्यंत त्याने आणि रुटने 195 धावांची तगडी भागीदारी केली.
यथावकाश, रुटने त्याचं 39 वं शतक पूर्ण केलं. त्याचं अभूतपूर्व सातत्य अन् दर्जा सिद्ध करणारं ते शांत, संयमी असं शतक होतं.
एकीकडे सामना हातून निसटत होता, दुसरीकडे क्रिकेटवेडय़ांचं भान सुटत होतं, कुणी हात जोडले, कुणी आकाशाकडे नजर लावली… अन् काय सांगू महाराजा, बेथेलला प्रसिद्धने त्रिफळाचित केलं. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला आवश्यकता 42 धावांची तर हिंदुस्थानला 5 बळींची. त्यानंतर प्रसिद्धनेच रुटला यष्टिरक्षक जुरेलकडे झेल द्यायला भाग पाडलं. इंग्लंडला गरज 37 धावांची तर हिंदुस्थानला 4 बळींची! आशेचा किरण उजाडला!
पण तेव्हाच पावसकरांनी बरसात केली… तरीही श्वासाचा सूर चढू द्या, छातीचा भाता धडकू द्या… शेवटच्या दिवशी इंद्राच्या महाली रंगतदार महफिल जमणार आहे!