
>>संजय कऱ्हाडे
इंग्लंडच्या बॅझबॉलला आमच्या यशबॉलने छान खणखणीत असं उत्तर दिलं. यशस्वी जयस्वालचं शतक आक्रमक, झुंझार होतं. कधी ते उग्र तर कधी ते धोके पत्करून साजरं केल्यासारखंही वाटलं. त्याला दोन जीवदानं मिळाली; पण त्यानेच इंग्लंड फलंदाजांच्या आयुष्यात इतक्या वेळा जान फुंकलेली होती की फिट्टमफाट झाली असं म्हणायला हरकत नाही! शतक पूर्ण करताना तो थोडा अधीर झाला, पण त्याने 126 चेंडूंत 12 चौकार आणि 2 षटकारांसह सोहळा साजरा केलाच! अखेर त्याच्याच अधीर, उतावीळ वृत्तीने त्याचा घात केला. ओली पोपने पॉइंटला लावलेल्या सापळय़ात टंगच्या उसळत्या चेंडूवर जयस्वाल फसला! अन् त्याच्याकडून अधिक धावांची अपेक्षा असताना बाद झाला.
अर्थात, या शतकादरम्यान त्याने आकाशदीपला हाताशी धरून 107 धावांची अत्यंत महत्त्वाची भागीदारी केली. आकाशदीपने आपल्या खंबीर 66 धावा 12 चौकारांच्या सहाय्याने केल्या. पहिल्या सत्रात त्यांच्याच भागीदारीमुळे हिंदुस्थानने तब्बल 114 धावा दणकावल्या. आकाशदीपने अगदी नियमित फलंदाजासारखीच सफाईदार फलंदाजी केली. आपलं पहिलं कसोटी अर्धशतक नोंदवलं. आकाशाची सफाई पाहिल्यावर पुढच्या वेळी करुण नायरला ‘रात्रीचा रखवालदार’ म्हणून पाठवायला काय हरकत आहे, असा विचार माझ्या मनात आला! या दौऱ्यावर करुण फार काही करू शकला नाही. त्याच्याच विनंतीनंतर क्रिकेटने दिलेली संधी त्यानेच खड्डय़ात घातली.
कप्तान गिलने एक कट अन् एक कव्हर ड्राईव्ह मारून मनाला मस्त खुशवलं खरं, पण उपाहारानंतरच्या पहिल्याच चेंडूवर तो पायचीत झाला आणि आनंदी मन मायूस झालं. या मालिकेत सातशेपार धावा केल्यानंतर नव्या विक्रमांना कवटाळण्याच्या मोहात तो पडला असं मी म्हणणार नाही. पण मालिकेत बरोबरी साधण्याची संधी दिसल्यावर त्याच्यातल्या कप्तानाने त्याच्यातल्या फलंदाजाची एकाग्रता मोडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कप्तान गिल आणि करुणला बाद करून सामन्यात उत्पंठा निर्माण करणाऱ्या अॅटकिन्सनने हुशारीने गोलंदाजी केली. टंगनेही त्याला अगदी बरोबरीने साथ दिली. तरीही हिंदुस्थानने चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रात 115 धावा फटकावल्याच!
क्रिकेटचा खेळ, प्रत्यक्ष आयुष्य आणि जीवनाचं गाणं हे सारं परस्परांशी जोडलेलं असतं असं म्हणतात. यशस्वी, आकाशदीप आणि करुण या तिघांसाठीही सुरेश भटांच्या एका गीताचे शब्द एकाच वेळी वेगवेगळ्या संदर्भात कसे चपखल लागू पाडताहेत तेच पहा…
रंगुनी रंगात साऱ्या,
रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या,
पाय माझा मोकळा!