IND Vs ENG 5th Test – निर्णायक कसोटी रोमहर्षक वळणावर! जैयस्वालचं शतक; आकाशचं अर्धशतक

अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील अखेरची व हिंदुस्थानच्या दृष्टीने निर्णायक असलेला पाचवा इंग्लंडविरुद्धचा कसोटी क्रिकेट सामना आता रोमहर्षक वळणावर पोहोचलाय. सलामीवीर यशस्वी जैयस्वालने दणकेबाज शतक ठोकून इंग्लिश गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. शुक्रवारी रात्रीचा रखवलदार म्हणून आलेल्या आकाश दीपनेही झुंजार अर्धशतक झळकावित जैयस्वालला दिलेली साथ लाखमोलाची ठरली. तिसऱ्या दिवशी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हिंदुस्थानने 8 बाद 357 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. रवींद्र जाडेजा 53 धावांवर बाद झाला, तर वॉशिंग्टन सुंदर 17 धावांवर खेळत होता.

अॅटकिन्सनचा धमाका

आघाडीची फळी पावणेदोनशे धावांतच तंबूत परतल्यानंतर कर्णधार शुभमन गिल (11) व करुण नायर (17) या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. या दोघांनाही गस अॅटकिन्सनने बाद करून हिंदुस्थानची 44.1 षटकांत 5 बाद 229 अशी अवस्था केली. अॅटकिन्सनने गिलला पायचित पकडले, तर नायरला यष्टीमागे स्मिथकरवी झेलबाद केले. जोश टंगने जैयस्वालला ओव्हरटनकरवी झेलबाद केले.

यशस्वी-आकाशची शतकी भागीदारी

हिंदुस्थानला 224 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने 247 धावा करीत पहिल्या डावात 23 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात हिंदुस्थानने दुसऱ्या दिवसाच्या 2 बाद 75 धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. यशस्वी जैयस्वाल व आकाश दीप या शुक्रवारच्या नाबाद जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानला सावरले. जैयस्वालने 164 चेंडूंत 14 चौकार व 2 षटकारांसह 118 धावांची खेळी करीत मालिकेतील दुसरे, तर कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक झळकाविले. आकाश दीपने 94 चेंडूंत 66 धावांची खेळी करताना 12 चेंडू सीमापार पाठविले. एमी ओव्हरटनने आकाशला अॅटकिन्सनकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली.

जाडेजाचा पुन्हा प्रतिकार

चौथ्या कसोटीत दणकेबाज नाबाद शतकी खेळी करीत हिंदुस्थानला वाचविणारा अष्टपैलू रवींद्र जाडेजा पुन्हा एकदा टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला. त्याने आधी ध्रुव जुरेल (34), तर नंतर वॉशिंग्टन सुंदरच्या साथीत इंग्लंड गोलंदाजीचा जोरदार प्रतिकार केला. मात्र, 77 चेंडूंत 5 चौकारांसह 53 धावांची खेळी करून जाडेजा बाद झाला. टंगने त्याला ब्रुककडे झेल देण्यास भाग पाडले.