…तर पर्यायी खेळाडू मिळायला हवा! कसोटीत मेडिकल सब्स्टिट्यूट नियमाला गंभीरचा पाठिंबा तर बेन स्टोक्सचा विरोध

कसोटी क्रिकेटमध्ये मेडिकल सब्स्टिटय़ूट अर्थातच वैद्यकीय बदली खेळाडू मिळावा म्हणून हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हा नियम लागू करावा म्हणून आपला पाठिंबा दर्शवला, मात्र इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने या नियमाला हास्यास्पद म्हणत नाकारले आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीपूर्वी मेडिकल सब्स्टिटय़ूटचा वाद उफाळून येणार हे निश्चित आहे. तसेच लवकरच आयसीसीच्या दरबारातही हा वाद पोहोचण्याची शक्यता दिग्गज क्रिकेटपंडितांनी वर्तवली आहे.

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील गेले चारही कसोटी सामने अत्यंत चुरशीचे झाले. सलग तीन कसोटी निर्णायक अवस्थेत संपल्या असल्या तरी चौथी कसोटी अनिर्णित राहिली. या कसोटीत ऋषभ पंतची दुखापत आणि मेडिकल सब्स्टिटय़ूट हा प्रकार चर्चेचा विषय होता. कसोटी संपल्यानंतर खेळत असलेल्या बदली खेळाडूला आपत्कालीन वैद्यकीय पर्याय असायला हवा, असे स्पष्ट मत गौतम गंभीर यांनी मांडत या नियमाला पाठिंबा दिला, मात्र बेन स्टोक्सने या नियमाबाबत चर्चा म्हणजे निव्वळ हास्यास्पद प्रकार असल्याचे मत व्यक्त करत आपला विरोध दर्शवला आहे.

गंभीर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की, मी या नियमाच्या बाजूने आहे. जर पंच आणि सामनाधिकाऱयांना खेळाडूची एखादी दुखापत गंभीर वाटत असेल तर अशा स्थितीत त्याला वैद्यकीय पर्यायी खेळाडू देणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या चुरशीच्या मालिकेत, जिथे गेले तिन्ही कसोटी सामने थरारक झाले, तिथे जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकला नाही आणि संघाला 10 विरुद्ध 11 असे खेळावं लागलं, तर ती फार दुर्दैवी गोष्ट असेल, असेही गंभीर म्हणाले.

मुळात चर्चाच हास्यास्पद

बेन स्टोक्सने ही चर्चाच हास्यास्पद असल्याचे सांगितले. यात खूप ‘लूपहोल्स’ असतील. संघाने एकदा 11 खेळाडू निवडल्यानंतर दुखापत ही खेळाचा भाग असते. तिच्यावर वैकल्पिक खेळाडू आणणं म्हणजे नियमांचा गैरवापर होऊ शकतो. पंतच्या दुखापतीमुळे वाद उफाळला. म्हणून स्टोक्सने या नियमावर फारशी चर्चा करणेच टाळले.

हिंदुस्थानचा यष्टिरक्षक ऋषभ पंतने चौथ्या कसोटीत पायाचे बोट प्रॅक्चर असूनही मैदानात उतरत धाडसी फलंदाजी केली आणि सर्वांची मने जिंकली, मात्र अशा गंभीर दुखापतीनंतरही वैद्यकीय सब्स्टिटय़ूट न मिळाल्याने ही चर्चा उफाळून आली.