टी-20 संघातील खेळाडू हाजिर हो! 1 मार्चपर्यंत अहमदाबादमध्ये दाखल होण्याच्या ‘बीसीसीआय’च्या सूचना

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानी संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंना 1 मार्चपर्यंत अहमदाबादमध्ये दाखल होण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या सर्व खेळाडू आपापल्या राज्यांकडून विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळत आहेत. हे खेळाडू 1 मार्चपर्यंत ‘टीम इंडिया’च्या बायो-बबलमध्ये दाखल होतील.

सलामीवीर शिखर धवनसह सूर्यपुमार यादव, राहुल तेवतिया, इशान किशन व वरुण चक्रवर्ती आदी खेळाडू विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळत आहेत. ही स्पर्धा वेगवेगळ्या शहरांत बायो-बबलमध्ये खेळली जात आहे. इंग्लंडविरुद्ध होणारी 5 सामन्यांची द्विपक्षीय टी-20 मालिका 12 ते 20 मार्च या कालावधीत होणार आहे.

सध्या उभय संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून, त्यातील दोन लढती चेन्नईमध्ये झाल्या आहेत. उर्वरित दोन कसोटी सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. कसोटी मालिकेत खेळत असलेले काही खेळाडू टी-20 संघातही आहेत. त्यामुळे इतर खेळाडूंना 1 मार्चपर्यंत ‘टीम इंडिया’च्या बायो-बबलमध्ये दाखल होण्यास सांगितले आहे.

स्थानिक स्पर्धा अर्ध्यावरच सोडावी लागणार 

हिंदुस्थानच्या टी-20 संघात निवड झालेल्या क्रिकेटपटूंना 27 फेब्रुवारीपर्यंतच विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळता येणार आहे. कारण 28 फेबुवारीला त्यांना अहमदाबादला जाण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे बाद फेरीत गेलेल्या काही संघांना मोक्याच्या वेळी आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंविना खेळावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या