लक्ष्य मालिका विजयाचे! हिंदुस्थान विजयाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज, इंग्लंडचे मालिकेत बरोबरी साधण्याचे ध्येय

इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’वर हल्ला चढवण्यासाठी यंग टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ने कसोटी क्रिकेटला रंगतदार केले असले तरी यशस्वी जैसवाल, शुबमन गिल आणि सरफराज खान यांच्या बॅटनेच मालिकेत धमाल उडवून दिली आहे. उद्यापासून सुरू होणाऱया चौथ्या कसोटीची खेळपट्टी कुणाची फिरकी घेणार हे कळेलच, पण यंग इंडियाने मालिका विजयच हे एकमेव लक्ष्य समोर ठेवलेय. दुसरीकडे सलग दोन पराभवांनी खचलेला पाहुणा संघ ‘बॅझबॉल’च्याच जोरावर मालिकेत पुनरागमन करण्यासाठी उतरणार आहे.

स्टोक्स-मॅकलम जोडी हरणार

गेली दोन वर्षे इंग्लंडने आपल्या ‘बॅझबॉल’ खेळाने अनेक संघाचे काम तमाम केले आहे. बेन स्टोक्सने 2 जून 2022 साली संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलमच्या साथीने त्यांनी एकही मालिका गमावलेली नाही. गेल्या दोन वर्षांत ते 21 कसोटी खेळलेत. ज्यापैकी केवळ सहा सामन्यांत पराभूत झालेत आणि केवळ एक सामना अनिर्णितावस्थेत सुटला. केवळ गेल्या वर्षीची ‘अॅशेस’ मालिका त्यांनी 2-2 अशी बरोबरीत राखली होती, मात्र अन्य मालिका ते जिंकले होते. मात्र हिंदुस्थानात त्यांच्या ‘बॅझबॉल’चा प्रयोग फसला आहे. जर ते रांचीत पुनरागमन करू शकले नाहीत तर स्टोक्स-मॅकलम जोडीचा पहिला मालिका पराभव असेल. या पराभवाने त्यांच्या बॅझबॉल वृत्तीचा खेळही थांबवावा लागू शकतो.

हिंदुस्थानचा संघ नाणेफेकीच्या वेळीच जाहिर

हिंदुस्थान आपल्या परंपरेनुसार आपला अंतिम 11 खेळाडूंचा संघ नाणेफेकीवेळीच जाहीर करणार आहे. विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराच्या जागी कुणाची निवड केली जाणार हे अद्याप गुप्त आहे. मात्र बुमराच्या जागी आकाशदीपला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच सलग दोन्ही कसोटी सामन्यांत आपली बॅटिंगची संधी लाभलेल्या रजत पाटीदारला बसवत देवदत्त पडिक्कलला पदार्पणाची संधी मिळू शकते. जर संघात आणखी एक फिरकीवीर खेळविण्याची वेळ आली तर पडिक्कल-पाटीदारऐवजी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संघात घेतले जाऊ शकते.

इंग्लिश संघात दोनच बदल

इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने अपयशी कामगिरीनंतरही जेम्स अॅण्डरसन आणि जॉनी बेअरस्टॉवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. फक्त संघात दोन बदल करताना मार्क वूडच्या जागी ओली रॉबिनसन आणि रेहान अहमदच्या जागी बशीर अहमदची निवड केली आहे.

हिंदुस्थान मायदेशात अपराजित राहणार

हिंदुस्थानी संघ गेल्या 12 वर्षांत आपल्या घरात वाघासारखा खेळतोय. 2012 नंतर एकही संघ त्यांना मालिकेत हरवू शकलेला नाही. 2012 साली इंग्लंडनेच चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने बाजी मारली होती, मात्र त्यानंतर सलग 16 कसोटी मालिका खेळला असून सर्व मालिकेत विजय मिळविला आहे. गेल्या 12 वर्षांत हिंदुस्थान 49 कसोटी सामने खेळला असून केवळ चार सामन्यांत त्यांना पराभवाची झळ बसली आहे तर 7 सामने अनिर्णितावस्थेत संपले असून 38 सामन्यांत यश संपादले आहे. आता 50वा सामना खेळताना हिंदुस्थान आपल्या मायदेशातील कसोटी मालिका विजयाची मालिका यंदाही कायम राखणार, हेच चित्र सध्या दिसत आहे.

यशस्वी जैसवाल द्विशतकाची हॅटट्रिक ठोकणार ?

विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये द्विशतक ठोकत यशस्वी जैसवालने अनेक विक्रमांची बरोबरी साधली. मात्र आता सर्वांच्या नजरा विश्वविक्रमाकडे लागल्या आहेत. कसोटी इतिहासात आजवर एकही फलंदाज द्विशतकांची हॅटट्रिक ठोकू शकलेला नाही. जैसवाल रांचीत द्विशतक ठोकू शकला तर तो पहिला कसोटी इतिहासातील पहिला फलंदाज ठरेल. तसेच एकाच मालिकेत तीन द्विशतकांच्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी साधेल. त्याचप्रमाणे यशस्वीला वेगवान एक हजार धावा करण्यासाठी 139 धावांची गरज आहे. जर तो हा टप्पा गाठू शकला तर हिंदुस्थानचा सर्वात वेगवान एकहजारी फलंदाज ठरेल.

हिंदुस्थानचा संभाव्य संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल/रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप/अक्षर पटेल.

इंग्लंडचा संघ ः बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्राऊली, बेन डकेट, ज्यो रुट, जॉनी बेअरस्टॉ, शोएब बशीर, बेन फॉक्स, टॉम हाटर्ली, ओली पोप, ओली रॉबिनसन, जेम्स अॅण्डरसन.