IND vs ENG Test Series – तो जागतिक क्रिकेटमधला एक सच्चा खेळाडू आहे… खुद्द अ‍ॅलन बॉर्डर यांनी केलं हिंदुस्थानच्या खेळाडूचं कौतुक

टीम इंडिया आणि इंग्लड यांच्यामध्ये ओव्हल येथे खेळला गेलेला पाचवा कसोटी सामना रोमहर्षक होता. दोन्ही देशांमधील क्रीडा प्रेमींसाठी हा एक सर्वोत्तम सामना ठरला असावा, ज्याचा त्यांनी मैदानामध्ये बसून आनंद घेतला असेल. टीम इंडियाने या रोमांचक सामन्यात 6 विकेटने विजय मिळवला आणि 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी अनिर्णीत सुटली. या सामन्यात लाखमोलाची कामगिरी केली ती मोहम्मद सिराजने. त्याने या सामन्यात शेवटच्या विकेटसह एकूण 9 विकेट घेतल्या. त्याच्या या खेळावर प्रभावित होऊन ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केलं आहे.

मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा (4 विकेट) यांनी दुसऱ्या डावात केलेल्या घातक माऱ्यामुळे टीम इंडियाला विजयश्री मिळवण्यात यश आलं. विशेष करून मोहम्मद सिराजने कहर बरसवणारी गोलंदाजी करत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला. त्याने 104 धावा देत पाच विकेट घेतल्या. सिराजच्या या प्रभावित करणाऱ्या गोलंदाजीमुळे क्रिकेट विश्वात सध्या त्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये अ‍ॅलन बॉर्डर यांचा सुद्धा समावेश आहे. FOX क्रिकेटवर बोलत असताना त्यांनी मोहम्मद सिराजच कौतुक केलं आहे. “शेवटची विकेट खूप महत्त्वपूर्ण होती आणि ते त्या विजयासाठी पात्र होते. मला वाटत आहे की मालिका हरण्यासाठी ते पात्र नव्हते. आव्हान कमी धावांच होतं, परंतु मोहम्मद सिराजने कसोटी क्रिकेटचा सर्वात रोमांचक शेवट केला. तो जागतिक क्रिकेटचा एक सच्चा खेळाडू आहे.” असं म्हणत अ‍ॅलन बॉर्डर यांनी सिराजचं कौतुक केलं आहे.